Spread the love

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचा कामगारहिताचा निर्णय

पिंपरी : प्रतिनिधी

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर घेऊन ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता दररोज कचरा संकलनाचे काम करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अधिक आनंदात साजरी होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ३० हजार रुपयांचे विशेष बक्षीस देण्याच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी या विषयाला मान्यता दिल्याने हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या या निर्णयामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टांची दखल घेण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून १९९७ पासून घंटागाडी कंत्राटदारांमार्फत शहरात कचरा संकलनाची सेवा राबविली जात आहे. महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज आणि ल अशा दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात ही यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांच्या घरातून कचरा गोळा करणे, त्याची वाहतूक करणे आणि शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवणे, अशी महत्त्वाची जबाबदारी या कर्मचाऱ्यांकडून पार पाडली जाते.

विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त आर्थिक बक्षीस देण्याची परंपरा महापालिकेत २००६ पासून सुरू आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्येही कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपयांचे विशेष बक्षीस देण्यात आले होते. यंदाही ही परंपरा कायम ठेवण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि घंटागाडी कंत्राटदारांकडून करण्यात आली होती.

कामगारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रशासनाने यंदाही मागील वर्षाप्रमाणेच ३० हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव पुढे आणला. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत मान्यता दिली होती. त्यानंतर या अनुषंगाने होणाऱ्या खर्चाच्या विषयाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत घंटागाडी कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सण-उत्सव असो किंवा सार्वजनिक सुट्टी, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ही सेवा नियमित सुरू ठेवावी लागते. त्यामुळे त्यांच्या कामाची योग्य दखल घेऊन दिवाळीच्या काळात आर्थिक बक्षीस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

याबाबत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, “शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी घंटागाडी कंत्राटदारांचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या श्रमाचा सन्मान करणे आणि सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक आधार देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ३० हजार रुपयांचे दिवाळी बक्षीस देण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडणार आहे. त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे आणि त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हाच या निर्णयामागील उद्देश आहे.”

महापालिकेच्या या निर्णयामुळे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार असून, कामगारहिताच्या निर्णयातून त्यांच्या श्रमाचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *