Spread the love

मुंबई : महिलांना अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री तथा आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे, प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांची उपस्थित होती

शरद पवार साहेब म्हणाले की, अनेक तास बसून देखील कोणी सभागृहाच्या बाहेर गेले नाही. सर्वांनी संघटनात्मक कामाबाबतची भूमिका मांडली आणि ऐकूण देखील घेतली आहे. सर्वांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत. यामध्ये महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत. आपण महिला आरक्षणाचा निर्णय घेतला होता.आरक्षण निर्णयामुळे स्पष्ट झाले की महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. तर आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः त्यावेळी संरक्षण मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात सुद्धा दिसत आहेत.

शरद पवार साहेब पुढे म्हणाले की, ही जमेची एक बाजू आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळे आपल्याला जागरुक राहावे लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठे घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर ते केस टाकतील, विविध कलमे लावत असतात. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि मग आपण त्या केसेस काढून टाकत असतो, असे आवाहनही शरद पवार साहेब यांच्याकडून महिलांना करण्यात आले. आता शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली आणि आता शाळा बंद करणे योग्य नाही. असे होतं असताना तुम्ही शांत बसत असाल तर हे योग्य नाही. सरकारी नोकरी कमतरता आहे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत आणि सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत हे योग्य नाही, असेही यावेळी शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार साहेब यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, सरकारी नोकरीमुळे कुटुंबात स्वास्थ्य असते, परंतु कंत्राटी पदावर नेमले तर तिथे आरक्षण नाही. त्यामुळे मला खात्री आहे. तिथे महिलांना संधी मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. यावेळी शरद पवार साहेबांनी महिला बेपत्ता होण्याच्या मुद्द्यावरून मत व्यक्त करत बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या आकडेवारीची माहिती दिली. १ जानेवारी पासून १ मे पर्यंत किती महिला बेपत्ता आहेत? याचं उत्तर मिळालं की १९ हजार ५५३ महिला बेपत्ता आहेत. यामध्ये १४५३ मुली या १८ वर्षांखालील असल्याचे शरद पवार साहेबांनी सांगितले. ही माहिती पावसाळी अधिवेशनात अनिल देशमुख यांना विधानसभेतून देण्यात आली आहे.

शरद पवार साहेब पुढे म्हणाले की, शाळा खाजगी कंपनीला देण्याचा यांनी निर्णय घेतला आहे. आता जी शाळा कंपनी दत्तक घेईल तिला तिचा वापर करता येईल. आता याचे उदाहरण द्यायचे झाले तर नाशिक जिल्ह्यातील एक शाळा मद्य कंपनीला दिली आणि त्यांनी त्या शाळेच्या ग्राऊंडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला हे गंभीर आहे असे शरद पवार साहेब म्हणाले.

आपले सरकार आल्यावर कंत्राटी नोकरीचा जीआर रद्द करू- सुप्रियाताई सुळे

कंत्राटी नोकरभरती जी केली जात आहे. ती बंद करायला हवी, त्यासाठी रस्त्त्यावर उतरावं लागणार. कारण कंत्राटी भरतीत आरक्षण नसतं आणि कंत्राटी भरती करून या सरकारला आरक्षण रद्द करायचं आहे, त्यामुळे असं राष्ट्रवादी होऊ देणार नाही. राज्यातील ज्या शाळा बंद केल्या जात आहेत, त्या पुन्हा सुरू करू. तसंच, महिला सुरक्षितता हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा. त्यावरही आमचा पक्ष काम करणार. तसंच एकल महिलांसाठीही योजना राबवली जाणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.

बाकीही हेडगेवार विसरून यशवंतराव चव्हाणांचं नाव घेत आहेत, यातच आपलं यश आहे. यशवंतरावांचं नाव घेणं २५ टक्के लोकांनी सुरू केलंय. उरलेल्या ७५ टक्के लोकांनी सुरू करायचं बाकी आहे. त्यांच्याही हे लक्षात आलंय की हेडगेवारांचं नाव घेऊन मतं मिळत नाहीत. ट्रिपल इंजिन सरकारमधील तिघांबाबत मी बोलतेय. याही सरकारमध्ये चव्हाणांचा फोटो मोठा होतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

आसामच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मला आनंद होतो. आसामचा संपूर्ण भाग ते कंट्रोल करतात. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांना भेटल्यावर मी नेहमी त्यांना थंम्प्स अप करते. मला सगळे म्हणतात तुम्ही त्यांना भेटल्यावर एवढं चिअरअप का करतात? कारण ते मुळचे काँग्रेसचेच आहेत. आता त्यांनी नॉर्थ इस्ट भाजपासाठी मोठं केलं असलं तरीही ते मुळचे काँग्रेसचे आहेत. त्यांच्याकडे कोणी टॅलेंट नाहीय, म्हणून त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात. पण आपला विचार तिथे जातोय हे चांगलंच आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा नागपुरात गुन्हेगारी वाढते. आर.आर. पाटील गृहमंत्री असताना, सगळं एकदम सुरळित सुरू होतं, ते एक सक्षम गृहमंत्री होते. असं म्हणत आपल्या राज्यात देशमुखांवर ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले.

 

जनतेच्या मनातील शरद पवारांबद्दलचं आदराचं स्थान माझं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं भांडवल : जयंतराव पाटील

शरद पवार साहेब आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात. यात सगळंच आलं. कार्यकर्त्यांना यावरून काय प्रकार सुरू आहे हे सगळं लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत. आपल्याला लढायचं आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा, त्यांची ताकद, जनतेच्या मनातील शरद पवारांबद्दलचं आदराचं स्थान माझं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं भांडवल आहे.

निवडणुकीला इतके पैसे खर्चायला देतो, तेवढे देतो. ते सगळं होईल, मात्र शिक्का मारायला माणसं कुठून आणणार? मतं देणाऱ्या माणसांच्या मनात शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवार जिथं उभे राहतील, तिथं पक्ष असेल. आज निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई सुरू आहे. त्या सुनावणीत शरद पवारांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं जात आहे. २५ वर्षे शरद पवारांच्याच कार्यशैलीमुळे यांना पदं मिळाली, हे मंत्री झाले, वेगवेगळ्या पदांवर पोहचले. आज २५ वर्षानंतर त्यांच्याच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करता, मग २५ वर्षे तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय? असा प्रश्न देखील यावेळी जयंत पाटील यांनी विचारला आहे.

शरद पवार हुकुमशाह आहेत, असा आरोप केला जात आहे. मात्र, या कार्यक्रमात इतका वेळ ते बसले आहेत, एकदाही ते तू बोलू नकोस, तूच बोल, कुणीच बोलायचं नाही, आता मीच एकटा बोलणार असं काही बोलले नाहीत. शरद पवार हुकुमशाहीने, मनमानी करून पक्ष चालवतात असा आरोप केला जात आहे. मात्र, माझ्यासह इथं बसलेल्या कुणालाही तो अनुभव नाही. एकटा जालना जिल्ह्यातील निर्णय घ्यायचा असेल, तरी शरद पवारांनी राजेश टोपे आणि त्या जिल्ह्याच्या अध्यक्षासह कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय प्रमुख निर्णय कधीच घेतला नाही. असे देखील यावेळी जयंतराव पाटील म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *