गांधी परिवार आरक्षण विरोधी; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
सक्सेस मीडिया ग्रुप
मुंबई : जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांचे पोटातील ओठावर आले. राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असे खडसावून विचारू, असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
बावनकुळे म्हणाले, ” राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा ते भारत विरोधी वक्तव्य करतात. त्यांना काही दिवस परदेशात जाण्यावर बंदी घालावी.”
बावनकुळे यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवसातील लेखाजोखा मांडला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्यामधील बहुतांश कामे मागील 100 दिवसांत मोदी सरकारने पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या कामांना जनतेसमोर घेऊन जात आहोत. महाराष्ट्राचा विकास डबल इंजिन सरकारच करेल हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, विमानतळे, मेट्रो, रेल्वे प्रकल्पाला मंजुरी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता, 2024-25 वर्षांसाठी शेतमालाचा हमीभावात वाढ, शेतकऱ्यांसाठी 14 हजार 200 कोटींच्या सात मोठ्या योजनांना दिलेली मान्यता सरकारचे हे काम लक्षणीय आहे.
मध्यमवर्गाला मोठा दिलासा देत 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केला आहे. युनिफाईड पेंशन योजना सुरू केली. शहरी योजनेंतर्गत 1 कोटी तर ग्रामीण भागात 2 कोटी घरांना मंजुरी प्रदान केली आहे. स्टार्टअप आर्थिक सवलत देण्यासाठी आणि नवोक्रमासाठी प्रोत्साहनासाठी योजना आखल्या आहेत. तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे तरुणांच्या रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल.
देशातील नारीशक्तिला सक्षम करण्यासाठी दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत 10 कोटी महिलांना एकत्र आणून 90 लाखाहून अधिक बचत गट तयार करण्यात येत आहेत. लखपती दिदी योजनेतून 11 कोटी महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्रात महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. महिलांसाठी 2500 कोटींचा सामुदायिक गुंतवणूक निधी जारी केला असून त्यातून 28 लाख महिला बचत गट सदस्यांना लाभ होईल.
ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानातंर्गत 63 हजार गावांचा विकास केला जाणार आहे. यातून 5 कोटी आदिवासींच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करण्यात आला असून 70 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत वीमा योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र, प्रशासन व कायदा व सुव्यवस्था, उर्जा सुरक्षा परराष्ट्र धोरण, आपत्ती व्यवस्थापन तसेच सुरक्षा यावर मोदी सरकारने चमकदार कामगिरी केली आहे.
पत्रपरिषदेला नागपूर महानगर जिल्हाध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.