चालकांच्या एकजुटीचा विजय; केंद्र सरकारकडून कायदा रद्द करत असल्याचा अध्यादेश काढला
पिंपरी : प्रतिनिधी
देशभरातील २५ कोटी चालकांवर अन्यायकारक असणारा हिट अँड रन कायदा अखेर केंद्र सरकारला मागे घ्यावा लागला. त्याबाबत नुकताच अध्यादेश देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशभरातील चालकांनी एकजूट दाखवत दिलेल्या लढ्याचे हे यश असल्याचे प्रतिपादन ऑटो, टॅक्सी, टेम्पो, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या या निर्णयाचे चालकांनी स्वागत केले आहे. पुढे आता चालक मालकांसाठी राष्ट्रिय आयोगाची स्थापना करणे. वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे. ड्रायव्हर दिवस घोषित करा आदीसह इतर विविध मागण्यांसाठी आता लढा देणार असल्याचं निर्धार बाबा कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांवर सातत्याने आंदोलन केले. त्याला अखेर यश मिळाले आहे याचा आनंद आहे. चालकांच्या विविध रखडलेल्या मागण्यांवर जनजागृती करण्यासाठी नुकतीच देशव्यापी ड्रायव्हर जोडो अभियान राबविले होते. या अभियानाला देशभरातील चालक-मालकांनी मोठा प्रतिसाद दिला. पंजाब, ओडीसा, कर्नाटक, तेलगणा, आंद्रप्रदेश, या राज्यांसह इतर अनेक राज्यांमध्ये चालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सभेच्या ठिकाणी लाखो लोकांची गर्दी जमत होती.
बाबा कांबळे म्हणाले की, हिट अँड रन विरोधी आंदोलनात प्रत्येक आंदोलनात सहभागी होत निदर्शने केली आहेत. पंजाब मध्ये सुरू असलेल्या ट्रक, टेम्पो चालकांच्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला होता. दिल्लीतील जंतर मंतर येथे दोन वेळेला आंदोलन केले होते. तसेच रिक्षा चालकांचे मेळावे घेऊन जनजागृती केली होती. केंद्र सरकारच्या प्रतीनिधिंना भेटून निवेदन दिले होते. त्याला यश आल्याचे बाबा कांबळे म्हणाले. आता पुढील मागण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनाच्या इशारा अन् सरकारला जाग
आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. त्याच धर्तीवर देशभरातील चालक मालक देखील दिल्लीत धडकणार होते. 26 फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला होता. केंद्र सरकारने चालक मालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करावी. मार्ग काढावा. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देखील बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन निवेदन देखील दिले होते. याची दखल घेत हा निर्णय रद्द करण्यात आला.
”केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत हिट अँड रन कायदा रद्द केला आहे. देशभरातील कोट्यवधी चालकांच्या एकजुटीचा हा विजय आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारचे आभार. तरीही इतर मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देऊन गरीब तोडगा काढावा, यासाठी आगामी काळात पाठपुरावा करणार आहे.”
– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो, टॅक्सी, बस, टेम्पो ट्रान्सपोर्ट फेडरेशन