श्रद्धास्थानाचे पर्यटन केंद्रात रूपांतर करण्याचा प्रयत्न
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
चिंचवड देवस्थान ट्रस्टने गेल्या अनेक दशकांपासून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सेवा, समर्पण आणि मानवतावादी दृष्टिकोन यांची सांगड घालणारे हे देवस्थान केवळ श्रद्धेचे केंद्र न राहता सामाजिक कार्याचे प्रेरणास्थान बनले आहे. या कार्याचा गौरव करत चिंचवड देवस्थानला भविष्यात ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा ठाम विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
‘क’ दर्जा पर्यटन विशेष निधीअंतर्गत श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील सुशोभीकरण व विकासकामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी चिंचवड येथे मंदिराच्या पवित्र प्रांगणात पार पडला. आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या कामांचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका मनीषा चिंचवडे, आशा सूर्यवंशी, देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र महाराज देव, विक्रम दौंडकर तसेच आजी-माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज हे महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. हिंदू धर्मातील पाच प्रमुख संप्रदायांपैकी गाणपत्य संप्रदायाचे ते अग्रणी मानले जातात. चिंचवड हे गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ असून, या भूमीला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. अशा पवित्र देवस्थानाच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे, असे त्यांनी नमूद केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय परंपरा, श्रद्धा व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. अयोध्येतील रामलल्ला मंदिर, जगन्नाथ कॅरिडोर यांसारखी उदाहरणे याची साक्ष देतात. २०२२ मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंचवड देवस्थानला ‘क’ दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यानंतर लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज या देवस्थानासाठी विकासनिधी उपलब्ध झाला आहे. भविष्यात अधिक निधी मिळवून देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पांतर्गत २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून मंदिर परिसर व मंगलमुर्ती वाडा परिसराचे सुशोभीकरण, पादुकामंदिर व सभामंडप बांधकाम, संरक्षण भिंत उभारणी, मुख्य प्रवेशद्वाराचे जतन-संवर्धन, पेव्हिंग ब्लॉक, दगडी पायऱ्या, स्टेनलेस स्टील रेलिंग, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, पाण्याची टाकी, अन्नदानासाठी छत्र तसेच भाविकांसाठी बसण्याची सोय आदी कामे करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमप्रसंगी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पवना नदीची आरती करून नदी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी बोलताना विश्वस्त जितेंद्र महाराज देव यांनी, “मोरयाचा धर्म आणि परंपरा जपण्याचे काम आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली अधिक गतीने सुरू आहे. निधी मिळवण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला,” असे गौरवोद्गार काढले.
ही विकासकामे केवळ भौतिक सुविधांपुरती मर्यादित नसून, श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारी ठरणार आहेत. शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाविक यांच्या संयुक्त प्रयत्नातून चिंचवड देवस्थानचा आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास अधिक भक्कमपणे घडणार आहे.
About The Author

