Spread the love

पुणे : प्रतिनिधी

७ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑटो व टॅक्सी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये रिक्षा चालकांचा कोणताही सहभाग असणार नाही, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतने जाहीर केली आहे. संघटनेचे युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सतत बंद पुकारण्याची फॅशन काही तथाकथित व बोगस संघटनांनी सुरू केली असून, त्याचा थेट फटका सामान्य रिक्षा चालक आणि प्रवाशांना बसत आहे.

शुभम तांदळे म्हणाले की, बंद हे आंदोलनाचे शेवटचे आणि टोकाचे हत्यार असते. सर्व पर्याय संपल्यानंतरच इतिहासात संघटनांनी बंदचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, आज काही संघटना कोणतीही ठोस तयारी किंवा पाठपुरावा न करता वारंवार बंद पुकारत आहेत. यामुळे रिक्षा व टॅक्सी व्यवसाय हळूहळू ओला–उबरसारख्या भांडवलदार कंपन्यांकडे वळत असून, स्थानिक व स्वतंत्र रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा चालक या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करताना तांदळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र रिक्षा पंचायत ही गरीब व कष्टकरी रिक्षा चालकांची संघटना आहे. संस्थापक अध्यक्ष व लढवय्ये नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना चालकांच्या हक्कांसाठी सातत्याने काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही खोट्या दाव्यांना बळी पडून रिक्षा चालकांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

जर कोणी रिक्षा चालकांवर जबरदस्तीने बंद पाळण्याचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही शुभम तांदळे यांनी केली. तसेच, कोणत्याही रिक्षा चालकाला धमकी, अडवणूक किंवा जबरदस्तीचा त्रास दिला गेल्यास त्यांनी त्वरित ७२७६२३२४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

रिक्षा चालकांकडे वैध मीटर असून, मीटरनुसार व्यवसाय करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. सर्व रिक्षा चालकांनी मीटरनुसारच प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहन करताना तांदळे म्हणाले की, ओला–उबरसारख्या अ‍ॅप आधारित प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या रिक्षा चालकांना अनेक वेळा मीटरपेक्षा कमी दर मिळतात. या अन्यायकारक पॉलिसींविरोधात सरकार दरबारी पाठपुरावा सुरू असून, त्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने यापूर्वी अनेक वेळा धरणे, मोर्चे आणि आंदोलने केली आहेत. मात्र, प्रत्येक वेळी बंद पुकारणे हा मार्ग योग्य नाही. सततच्या बंदांमुळे प्रवाशांचा रिक्षा–टॅक्सी सेवांवरील विश्वास कमी होत असून, त्याचा फायदा थेट खासगी कंपन्यांना होत आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

शेवटी, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या बंदपासून रिक्षा चालकांनी स्वतःला पूर्णपणे दूर ठेवावे आणि आपला व्यवसाय नियमितपणे सुरू ठेवावा, असे स्पष्ट आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *