पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
वाल्हेकरवाडी येथील न्यायालयीन वादाचा विषय असलेली व माझ्या स्वतःच्या ताब्यातील मिळकतीचा ताबा विरुद्ध पार्टीला सोडण्यासाठी मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुहास शिवाजी भेगडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्याकडे दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी एका पत्राद्वारे केली आहे.
तक्रारदार सुहास शिवाजी भेगडे यांनी पत्रात म्हटले आहे की, मी सुहास शिवाजी भेगडे मौजे वाल्हेकरवाडी येथील सर्वे नं. ८० मधील हिस्सा क्र. २/३/४/१/३ २२.५० आर ही मिळकत तत्कालीन मालक बिपीन संघवी यांच्या कायदेशीर वारसाकडून नोंदणीकृत खरेदीखताने विकत घेतली आहे. त्याचे खरेदीखत १२२३०/२०२३ या क्रमांकाने दि.०९/०६/२०२३ रोजी मे. सब रजिस्ट्रार, हवेली क्र. २२ यांच्यासमोर नोंदविले आहे. त्या जागेचा ताबा तेव्हापासूनच माझ्याकडेच आहे.
सदर जागे संदर्भात पूर्वाश्रमीचे मालक संघवी व तत्कालीन वेळेत जागा विकत घेणारे कोळपे, साळवे, सरोदे, येवले, अडसकर,चाबुकस्वार इ. यांचे ताब्यावरून बरेच वाद होते. याबाबत बऱ्याच तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. चिंचवड पो.स्टे. यांनी फौजदारी संहिता कलाम १४५ नुसार ताबा ठरविण्यासाठी अधिकृतरीत्या कळवल्यावरून तत्कालीन मे. प्रांत अधिकारी यांनी या जागेचा ताबा संघवी यांचा असल्याचे गुणवतेवर ठरवले. तसेच दिवाणी न्यायालयात जाण्याचे निर्देश अधिक स्पष्टता यावी म्हणून दिले होते. तसेच तत्कालीन मे. अधीक्षक, भूमी अभिलेख यांनी देखील मोजणीच्या संदर्भाने विरोधी पार्टीला दिवाणी न्यायालयात जाण्याबाबत सुचवले होते. तोपर्यंत तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या जागेची मोजणी करू नये, असे आदेशित केले होते, असे सुहास शिवाजी भेगडे यांनी म्हटले आहे. दरम्यानच्या काळात संघवी यांच्याशी ताब्यावरून वाद असणारे कोळपे, साळवे, सरोदे, येवले, अडसकर, चाबुकस्वार इ. यांनी त्यांनी विकत घेतलेल्या जागेचा ताबा त्यांना मिळालेला नसल्याचे पोलीस स्टेशनला जबाबात नमूद केले होते. असे असूनसुद्धा त्यांच्याकडून जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न करणारे रमणिकलाल जैन व विवेक जैन यांनी केवळ कागदावर असलेली ८०/२/३/४/१/२ हि मिळकत विकत घेतली. आमच्या ताब्याला ते हर प्रकारे हरकत घेवून ताबा हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याबाबत त्यांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. परंतु, आम्ही उच्च न्यायालयात धाव घेवून चिंचवड पो.स्टे.च्या विरुद्ध मे. उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय आरोपपत्र दाखल न करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान जैन यांनी अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे आम्ही केलेली मोजणी आव्हानित करून त्याच न्यायालयाच्या दिवाणी न्यायालयात जाण्याचा आदेश असताना देखील त्या स्वत:च्याच निर्णयाच्या विरुद्ध जावून आमच्याविरुद्ध निकाल आणला आहे. त्याआधारे पुन्हा ताब्याचा दावा करत आहेत.
सदर जागेवर ताब्याचा दावा करणारे रमणिकलाल जैन व विवेक जैन यांनी मला अभय मांढरे यांच्यामार्फत आम्हाला जागेचा ताबा तत्काळ सोडण्याचे सुचवले. तसेच ताबा न सोडल्यास ” पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने आमच्यावर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची तसेच इतर खोटे गुन्हे दाखल करण्याची व आम्ही कधीही ताबा मिळवू शकतो. तसेच तुमचा कार्यक्रम पण करू शकतो”, अशी धमकी दिली आहे. तसेच तुरुंगातून गंभीर गुन्हयातून बाहेर आलेले अनेक गुंड आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्यामार्फेत आमचा कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे, असेही तक्रारदार सुहास शिवाजी भेगडे यांनी म्हटले आहे.
या प्रकारामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून चिंचवड परिसरात अश्या प्रकारच्या जमिनीच्या वादावरून गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे माझी अभय मांढरे, विवेक जैन, रमणिकलाल जैन यांच्याविरुद्ध ‘आम्हाला आम्ही विकत घेतलेल्या जागेचा ताबा न सोडल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची तसेच गुंडाकरवी जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबतच्या तक्रारीची चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे नोंद घ्यावी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे या पत्रात तक्रारदार सुहास शिवाजी भेगडे यांनी म्हटले आहे.