Spread the love

8पुणे : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूका शांततेत व सुरळीत तसेच निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले.

 

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे, माध्यम कक्षाचे समन्वयक शिवप्रसाद बागडी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देवून श्री.सिंगला म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असून १८ एप्रिल रोजी निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील.

 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय ७ वा मजला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी या ठिकाणी ही नामनिर्देशन पत्रे स्विकृत केली जातील. २५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख असून २६ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल तर २९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल.१३ मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी प्रक्रीया पार पडेल.

 

निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. सुमारे १८ हजार मनुष्यबळाची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्यादृष्टीने समन्वयासाठी १६ नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रीयेच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांना माहिती देऊन अवगत करण्यात येणार आहे.

 

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, पिंपरी, चिंचवड अशा ६ विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ११४ पथके स्थापन करण्यात आलेली आहेत.

 

दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मतदान केंद्रावर देखील आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. संपर्क व्यवस्थेत बाधा येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात आली आहे.

 

याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणाची, मतदान यंत्रे, मतदार संख्या इत्यादी बाबतची माहिती श्री.सिंगला यांनी दिली. मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास मनाई आहे, असे सांगून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून राजकिय पक्षांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

श्री. परदेशी म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाद्वारे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्त करण्यात आलेले अधिकारी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आवश्यकता विचारात घेतील आणि त्यानुसार प्रत्येक केंद्रावर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येईल.

 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. निवडणूक प्रक्रीयेला सामोरे जाण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *