मावळ : प्रतिनिधी
गद्दारांच्या मदतीने राज्याची सत्ता मिळवलेल्या भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी शेतक-यांना वा-यावर सोडण्याचे काम केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बळीराजाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी प्राधान्याने घेतला आणि तो तातडीने लागूही केला. परंतु, या भाजप सरकारला घरी बसविण्यासाठी मतदान करा आणि मावळ लोकसभेत शिवसेनेची मशाल पेटवा, असे आवाहन महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
मावळ लोकसभेची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ कळंभ जिल्हापरिषद, कावोळे व गौर कामत विभागातील नागरिकांशी कडाव येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे संवाद मेळावा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या मेळाव्याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस रामशेठ राणे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, काँग्रेसचे कर्जत तालुका अध्यक्ष संजय गवळी, रायगड जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख सुवर्ण जोशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनानाथ देशमुख, आपचे डॉ. रियाज पठाण, कळंब ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोडलीकर, हुतात्मा पाटील, भाई कोतवाल, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंती हिंदोला, जांमरुखचे सरपंच दत्तूशेठ पिंपरकर, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनानाथ देशमुख, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी मते, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती यशवंत जाधव, माई कोतवाल, हिराजी पाटील, आदिवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोविंद ठोंबरे, महिला तालुका संघटक करुणा बडेकर, माजी पंचायत समिती सदस्य अंजली शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक-युवती यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
वाघेरे पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकर्यांना दिलासा देणारी भुमिका राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेब यांनी घेतली. शेतकर्यांसह सर्व समाज घटकांसाठी ममतेने कामे केली. अनेक योजना लागू केल्या. मात्र, सध्याच्या केंद्र व राज्यातील सरकारला शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाची चिंता नाही. शेतकरी वर्गासाठी ठोस असे काम झाले नाहीत. त्यांच्यासाठी नवीन योजना आणल्या गेल्या नाहीत. शेतकर्यांना अक्षरश: वार्यावर सोडण्याचे पाप राज्यातील महायुती सरकारने केले आहे. सर्वसामान्य आणि महिला वर्गाची काहीच चिंता दिसत नाही. देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. देशासह राज्यात वाढत्या बेरोजगारीने गंभीर रूप धारण केले आहे. बेरोजगार युवक रस्त्यांवर उतरून आंदोलन करीत आहेत. अनेक घटकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. देश कोठे नेऊन ठेवला आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. अशा हुकुमशाही आणि जुलमी सरकारला खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी मावळ लोकसभेतून संजोग वाघेरे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्या दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मशाल हे चिन्ह घेऊन गावागावात प्रचार करत आहेत. मशाल चिन्ह घरोघरी आणि प्रत्येकांपर्यंत पोहोचले असून कर्जत विधानसभेतून सर्वाधिक मताधिक्य संजोग वाघेरे पाटील यांना मिळेल, असा विश्वास यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला.