पुणे : प्रतिनिधी
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ च्या अंतिम निकालात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे, अशी माहिती सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार यांनी दिली आहे.
निवड यादीमध्ये पुणे जिल्ह्यातून ६, नाशिक जिल्ह्यातून ५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी अशा एकूण २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील होतकरु उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता संस्था प्रयत्न करते. युपीएससी परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देवून नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येते.
मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी प्रशिक्षण देण्यात आलेल्या ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत.
सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून या देशाच्या विकासात महाराष्ट्राचा ठसा उमटावा, अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिल्या आहेत.