Spread the love

पुणे : प्रतिनिधी

मतदारसंघात स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याकरीता विविध उपक्रम राबवून जनजागृती करावी; याकरीता स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, बचत गटातील महिला आदी घटकांचा सक्रीय सहभाग घ्यावा, अशा सूचना बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिल्या.

 

विधानभवन येथे आयोजित बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयक अधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, अतिरिक्त समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

 

श्री. द्विवेदी म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या मतदान केंद्रावर येत्या ७ मे रोजी अधिकाधिक मतदान होईल, याबाबत नियोजन करावे. मतदारांना मतदान केंद्र आणि केंद्रावरील सुविधांबाबत तसेच मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात यावी. मतदार चिट्ठीचे वेळेत वितरण करावे. याबाबत नोंदवही अद्ययावत ठेवावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर विशेष लक्ष देऊन काम करावे. सहा पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात.

 

लोकसभा मतदारसंघात भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), आदर्श आचारसंहिता कक्ष (एमसीसी) पथकांने देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे अधिक प्रभावीपणे कामे करावीत. मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी. केलेल्या कारवाईबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असेही श्रीमती. द्विवेदी म्हणाल्या.

 

श्री. अरगुंडे म्हणाले, निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा, अशा घटनांवर विशेष लक्ष ठेऊन कारवाई करावी. आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष द्यावे. निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घ्यावी, सी-व्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईमध्ये सातत्य ठेवावे. आवश्यकता भासल्यास पथके वाढवावी. कारवाईच्या अनुषंगाने आवश्यतेनुसार सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी, असे श्री. अरगुंडे म्हणाले.

 

श्रीमती चंद्राकर म्हणाल्या, मतदारांना मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करावे. स्वीप उपक्रमांअंतर्गत विविध यशस्वी उपक्रम राबवावेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *