
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
भाषेचे मूळ शोधणे अवघड नसते. मौखिक परंपरेने जपत आलेले लोकसाहित्य हेच मूळ साहित्य असून, आपल्या लोकसाहित्याच्या आदिम व्यवस्थेमध्ये मराठी भाषेची मूळ शोधता येते, असे मत मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात साहित्य अकादमी आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकरंगभूमी आणि अभिजात मराठी’ विषयावरील एक दिवसीय परिसंवादात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे, ज्येष्ठ कादंबरीकार व साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नायर, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ. मुकुंद कुळे, संतोष शेणई, सोपान खुडे, प्रभाकर ओव्हाळ, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, सदस्या निरुपा कानिटकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तसेच संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
डॉ. आवलगावकर म्हणाले, की आपले आदिम जमातीचे नृत्य हे लोकरंगभूमीचे पहिले पाऊल म्हणता येईल. शास्त्रीयतेत ‘घराणे’ हा शब्द तयार होण्याच्या कितीतरी आधी लोकरंगभूमीने आपली एक स्वतंत्र परंपरा निर्माण केली होती, असे बोलून त्यांनी मराठीच्या आदिम परंपरेचा गौरव केला.
बीजभाषक म्हणून आपले मत मांडताना डॉ. प्रकाश खांडगे यांनी अभिजात भाषांनी बोलीभाषांना गावकुसाबाहेर ठेवले असल्याची खंत व्यक्त केली. अभिजात भाषेला ऊर्जा देण्याचे काम बोलीभाषा करत असतात. लोकरंगभूमीवरील अभिजात मराठी भाषा ही उस्फूर्त अशा पारंपरिक, लवचिक आणि प्रभावी बोली भाषेचेच एक रूप असल्याचेही त्यांनी सांगितले.
वामन केंद्रे म्हणाले की, प्रयोगरुपाने आविष्कृत होणारी भाषा म्हणजे रंगभाषा होय. लोकरंगभूमीवरील भाषेची क्षमता ही नाटक आणि सिनेमापेक्षा वेगळी आहे, हेच तिचे मोठे बलस्थान आहे. दृष्य, काव्य, सौंदर्याची अनुभुती कायमस्वरुपी मनावर कोरली जाते. ती सर्वोच्च रंगभाषा ठरते.
अध्यक्षीय भाषणात विश्वास पाटील म्हणाले, की पारंपरिक तमाशात बदल करुन स्थळ काळाचा स्वर लोककलाकारांनी पकडला पाहिजे. कुठलीही कला ही स्थळ काळाचा नवा स्वर जोपर्यंत पकडत नाही, तोपर्यंत ती जिवंत राहू शकत नाही. ती लोकांच्या भावनेचा किंवा आशा आकांक्षाचा आवाज होऊ शकत नाही. आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. मराठी भाषेवर, मुंबईवर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बादशहांची नजर पडते आहे. हे बादशहा आमची भाषा, संस्कृती, साहित्य गिळायला निघालेत. या कठीण काळात लेखक, कलावंत, अभ्यासक यांनी काळाची गरज म्हणून आपली मराठी भाषा आणि संस्कृती सांभाळायला हवी.
या परिसंवादात विधीनाट्य आणि भक्तीनाट्याची लोकभाषा आणि अभिजात मराठी या सत्राचे अध्यक्षपद संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी भूषविले. ज्येष्ठ लोककला अभ्यासक व पत्रकार मुकुंद कुळे आणि संतोष शेणई यांनी अनुक्रमे विधीनाट्य व भक्तीनाट्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
समारोप सत्रात वगनाट्य, लोकनाट्य व तमाशाची रंगभाषा व अभिजात मराठी या विषयावर मान्यवरांनी चर्चा केली. या चर्चासत्राचे अध्यक्षपद डॉ.प्रकाश खांडगे यांनी भूषविले. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख व सुप्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून तमाशा आणि अभिजात मराठी या विषयावर मार्गदर्शन केले. लोकनाट्य या विषयावर ज्येष्ठ लोककला अभ्यासक सोपान खुडे यांनी, तर लोकनाट्य विषयावर ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांनी उपस्थित मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी, स्वागत साहित्य अकादमीचे प्रभारी ओमप्रकाश नागर यांनी केले सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा. सत्यजित खांडगे यांनी, तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी मानले.
About The Author

