
तळेगाव दाभाडे प्रतिनिधी
“माझी वसुंधरा ६.०” अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना शेवगा लागवडीसाठी वृक्ष वाटप करण्यात आले.
“माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पर्यावरण संवर्धन व हरित शहर निर्मितीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून देशी प्रजातींच्या वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. या अनुषंगाने बांबू, खस आणि शेवगा या उपयुक्त प्रजातींच्या लागवडीबाबत राज्य शासनामार्फत निर्देश प्राप्त झाले आहेत. शेवगा हा बहुपयोगी औषधी वनस्पती असून, त्याचे पान, शेंग, फुले आणि साल यांचा विविध प्रकारे उपयोग होतो. यामध्ये व्हिटॅमिन A, C, कॅल्शियम, लोह आणि प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. त्याशिवाय शेवग्याच्या पानांपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना देशी आणि परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शेवगा प्रजातीची रोपे नागरिकांना व परिसरातील विकासकांना दि. ०२/०७/२०२५ रोजी १०० वृक्ष वितरित करण्यात आले आहेत. १० जुलै पर्यंत १००० वृक्ष रोपे वाटप करण्याचा निर्धार नगरपरिषदेने केला आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात, सोसायटी, प्लॉट, संस्था परिसरात ही रोपे लावून त्याचे योग्य संगोपन करणे अपेक्षित आहे.
ही एक सामाजिक व नैतिक जबाबदारी असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. गावातील शेतकरी, महिला बचत गट, गणेश मंडळे, सहकारी गृहरचना संस्था आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून शेवग्याचे रोपण करून आरोग्यदायी व हरित पर्यावरणाच्या दिशेने पाऊल टाकावे आपण सर्वांनी एकत्र येऊन “हरित तळेगाव” घडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे. सदर कार्यक्रमा प्रसंगी कन्हैया थोरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गणेश लोंढे पोलीस उपनिरीक्षक, अहमद मुल्ला पोलिस उपनिरीक्षक, कर अधिकारी कल्याणी लाडे तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
About The Author

