Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी आयुक्त राहुल महिवाल यांनी केली.

आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज असून पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली.

 

या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, बाबासाहेब गलबले, उपआयुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, निलेश भदाणे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, यशवंत डांगे, मुकेश कोळप, विनोद जळक, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून सर्वांच्या समन्वयाने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.

 

निगडी येथील भक्ती शक्ती याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारला जातो.येथे करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दलची माहिती राहुल महिवाल यांनी पाहणीदरम्यान घेतली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदीरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असतो. आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथे दिंड्यांचा मुक्काम असतो. याठिकाणी शाळांमध्ये करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणीही त्यांनी पाहणी केली.

 

पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्व होर्डिंग्जची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे, विविध ठिकाणी दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर महत्वाच्या ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक देखील करण्यात आली आहे.

 

पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्षेत्रातील नदीतून जलपर्णी काढण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

 

पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गाची वेळोवेळी पाहणी करुन खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या पार्कीगच्या जागी पार्कींग संदर्भातील फलक तसेच महापालिकेमार्फत वारक-यांकरिता पुरविण्यात येणा-या सुविधां संदर्भातील फलक लावण्यात येणार आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहे.

 

याव्यतिरिक्त, वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून मुक्कामाच्या ठिकाणी रस्त्यावरील तसेच पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. पालखीच्या मार्गावर व कार्यक्रमांच्या ठिकाणी, मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे.

 

पालखी मार्गावर तसेच मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीन ठेवण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोहळा कालावधीत वारकऱ्यांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात मोफत वैद्यकिय सुविधा २४ तास उपलब्ध करुन देण्यात येणार असून फिरता दवाखानाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर योग्य त्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *