Spread the love

७३० इच्छुकांच्या मुलाखतींमुळे राजकीय वातावरण तापले

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहरात राजकीय शक्तीप्रदर्शन घडवून आणले आहे. मोरवाडी येथील भाजप पक्ष कार्यालयात दोन दिवस चाललेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. तब्बल ७३० इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज करून मुलाखती दिल्याने भाजपची संघटनात्मक ताकद, जनतेचा विश्वास आणि निवडणुकीतील आघाडी स्पष्टपणे दिसून आली.

१६ आणि १७ डिसेंबर रोजी झालेल्या या मुलाखती केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता, शहराच्या भविष्यातील नेतृत्व ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरल्या. या मुलाखतींमध्ये प्रत्येक प्रभागातील सामाजिक वास्तव, स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि नेतृत्वक्षमता यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

भाजपचे शहर निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंत व्यक्तींची उपस्थिती आणि सहभागामुळे मुलाखतींचे महत्त्व अधिकच वाढले.

मुलाखत प्रक्रियेबाबत बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, “भाजपने नेहमीच पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सक्षम नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवाराची सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक अनुभव, राजकीय वाटचाल आणि प्रभागातील कामगिरी यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. याच स्पष्ट निकषांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.”

गेल्या दहा वर्षांत पिंपरी चिंचवड शहराने औद्योगिक केंद्रापासून मेट्रो शहरापर्यंतचा प्रवास वेगाने केला आहे. “दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकसंध विचारसरणी आणि मजबूत नेतृत्व असल्यास विकासाचा वेग दुप्पट होतो, हे शहराने अनुभवले आहे. त्यामुळे ‘भाजपच्या माध्यमातून शहराची प्रगती’ हेच समीकरण आता उमेदवार आणि मतदारांनी स्वीकारले आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या मुलाखतींमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेची लाट निर्माण झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

“या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचा सविस्तर अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे संघटन अधिक बळकट होत आहे. शहराच्या विकासाला गती देणाऱ्या सक्षम उमेदवारांबाबतच अंतिम निर्णय घेतला जाईल.”

— आमदार शंकर जगताप, निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड शहर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *