कडेकोट सुरक्षेत स्ट्राँगरूममध्ये साठवण
पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे आणि निवडणूक अनुषंगिक साहित्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पिंपरी येथे दाखल झाले आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून ही यंत्रसामग्री नियोजनपूर्वक हलविण्यात आली.
या ताफ्यात बीड जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा आणि आष्टी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आजरा, कागल, भुदरगड, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यांमधून आणलेल्या ईव्हीएम यंत्रांचा समावेश होता. सर्व वाहनांचे मार्ग पूर्वनिर्धारित नकाशानुसार निश्चित करण्यात आले होते. चार स्वतंत्र वाहनांच्या ताफ्यातून ही सामग्री पिंपरीत दाखल होत असताना संपूर्ण हालचालीवर सतत नियंत्रण आणि नोंद ठेवण्यात आली.
या संपूर्ण कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी प्रमोद ओंभासे आणि सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पवार, अभिमान भोसले, संतोष कुदळे, राहुल पाटील आणि इंद्रजीत जाधव यांनी प्रभावी समन्वय साधला. या कार्यवाहीत सुमारे २७ महापालिका कर्मचारी, १२ व्हिडिओ कॅमेरामन आणि १६ सशस्त्र पोलिस कर्मचारी तैनात होते. सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धपणे राबविण्यात आली.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार सुसज्ज स्ट्राँग रूमची व्यवस्था पूर्वीच करण्यात आली होती. ईव्हीएम यंत्रे येथे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्थानिक राजकीय पक्षांचे नियुक्त प्रतिनिधी यांना पूर्वसूचना देत, नियमांनुसार स्ट्राँग रूम पाहणीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
वाहनांच्या सीलबंद स्थितीची पडताळणी पोलिस अधिकारी, निवडणूक अधिकारी आणि पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर सील उघडून ईव्हीएम यंत्रे स्ट्राँग रूम अधिकारी संजय काशिद, सत्वशील शितोळे आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली अत्यंत काळजीपूर्वक उतरविण्यात आली. सर्व यंत्रे निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार सीलबंद अवस्थेत संग्रहीत ठेवण्यात आली आहेत.
संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडल्याचा प्रशासनाकडून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ईव्हीएम साठवणूक आणि सुरक्षा व्यवस्थेतील ही काटेकोर तयारी आगामी मतदानासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, मतदारांना सुरक्षित आणि निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावण्यास ही व्यवस्था सहाय्यभूत ठरणार आहे.
About The Author

