Spread the love

पारदर्शक, नि:पक्षपाती निवडणुकीचे आयुक्तांचे स्पष्ट निर्देश

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, नि:पक्षपाती आणि नियमबद्ध पद्धतीने राबवली जाणार असल्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले. निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय राखत जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त, उपजिल्हाधिकारी, सह व उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडले जाणार असून प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यानुसार ईव्हीएमची रचना, तांत्रिक व्यवस्था आणि मतदान प्रक्रिया आखण्यात येत आहे. मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार असल्याने त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी आत्तापासूनच करण्यात येत आहे.

शहरात सुमारे १७ लाख मतदार असून त्यांच्या नियोजनासाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता राहावी यासाठी प्रत्येक स्तरावर पुरेसे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मतदारांच्या सुविधेला प्राधान्य देत काही ठिकाणी नव्याने मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. संबंधित प्रभागातील मतदान केंद्र त्या प्रभागातच राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांशी समन्वय साधून वाहतूक व कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा, संवेदनशील व आदर्श मतदान केंद्रांची निश्चिती आणि मतदान साहित्याची गुणवत्ता तपासणी यावर विशेष भर देण्यात आला.

मतदार याद्यांबाबत प्राप्त झालेल्या सुमारे एक लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून चुकीच्या प्रभागातील नावे दुरुस्त करण्यात आली आहेत. दुबार मतदारांची पडताळणी प्रभाग स्तरावर सुरू असून ही प्रक्रिया २७ तारखेपर्यंत पूर्ण करून त्याच दिवशी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीत निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून निवडणूक कार्यक्रम, वेळापत्रक व जबाबदाऱ्या यांची सविस्तर माहिती उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.

निवडणूक प्रक्रिया संवेदनशील असल्याने सर्वांनी सतर्क राहून सूक्ष्म नियोजन करावे, कोणतीही अडचण आल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे आणि निवडणूक यशस्वी, शांततेत व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *