भाजपा आमदार महेश लांडगे यांची ‘कमिटमेंट’ पूर्ण
पिंपरी । प्रतिनिधी
डुडूळगाव येथील सोसायटीधारकांना ड्रेनेज व्यवस्थेअभावी आर्थिक भुर्दंड आणि मन:स्ताप सहन करावा लागत होता. याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने कार्यन्वीत असलेल्या ‘परिवर्तन हेल्पलाईन’ तक्रार दाखल झाली होती. अवघ्या २४ तासांत सदर ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे सुमारे ८०० कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये १९९७ मध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी या गावांचा समावेश झाला. झपाट्याने नागरीकरण झाले. मात्र, त्या तुलनेमध्ये पायाभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्या नाहीत.
दरम्यान, २०१४ पासून आमदार महेश लांडगे यांनी ‘समाविष्ट गावांचा विकास’ हा अजेंडा घेतला. महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर या भागातील सोयी-सुविधांना चालना देण्यात आली. त्यामुळे ‘‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित झाला. तरीही अद्याप काही सोसाट्यांपर्यंत महापालिका प्रशासनाकडून ड्रेनेज लाईनचे काम झालेले नाही.
डुडूळगावमधील इंद्रभूमी सोसायटी, नाथ रेसीडेन्सी सोसायटी, रवितेज सोसायटी, मॅजिक सोसायटी, मंगलम पॅराडाईज सोसायटी, मंगलम सिंग्नेचर सोसायटी या सर्व सोसायट्यांना मुख्य ड्रेनेज लाईन जोडण्यात आलेली नव्हती. याबाबत सोसायटीधारकांनी आमदार महेश लांडगे यांच्या ‘परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90’ वर तक्रार केली. याची तात्काळ दखल घेत अवघ्या २४ तासांत सदर कामाला सुरूवात करण्यात आली. ड्रेनेजलाईन अभावी नागरी आरोग्य, दुर्गंधीचा प्रश्न निर्माण झाला होता. या कामाचे भूमिपूजन कामगार नेते सचिन लांडगे, योगेश तळेकर, विक्रम हिले आणि सोसायटीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध सोसायटीधारकांच्या पायाभूत समस्या तातडीने मार्गी लावण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा आणि नागरी आरोग्य याबाबतच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जात आहेत. नागरिकांनी नागरी समस्या सोडवण्याकरिता ‘परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90’ वर सतर्कतेने सूचना करावी. त्यावर निश्चितपणे कार्यवाही करण्यात येत आहे. समाविष्ट गावांच्या विकासाचा निर्धार कायम आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.