जागामालकांशी समोपचाराने चर्चा करुन काढला तोडगा; भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पुढाकार
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीच्या नागरिकांना गेल्या १० वर्षांपासून रस्ता उपलब्ध झाला नाही. खासगी जागा मालकांनी याकामी आता सकारात्मक पुढाकार घेतल्यामुळे सदर रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने खासगी जागामालक यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाशी सामोपचाराने चर्चा केली. बाजार समितीने परवानगी दिली. त्यामुळे १८ मीटर रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या भागातील सुमारे ५०० कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. जागामालक विलास जेऊरकर, पोपट बोराटे, शिवाजी सस्ते, अक्षय कोलते यांनी सहकार्य केले. यावेळी माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे-सस्ते, अश्विनी जाधव, नितीन बोऱ्हाडे, निखिल बोऱ्हाडे, संतोष जाधव, तुषार सस्ते, मिनिनाथ सस्ते, दगडू आल्हाट यांच्यासह शिवशंभो कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.
- पाणी आणि रस्ता दोन्ही प्रश्न सुटले…
शिवशंभो कॉलनीमध्ये एका बिल्डरने एक ते दोन गुंठेचे प्लॉटिंग करुन ९ वर्षांपूर्वी नागरिकांना विकले. पण, त्या जागेला येणारा रस्ता दुसऱ्या शेतकऱ्याचा असल्यामुळे नागरिकांना महापालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकता येत नव्हती. याकामी माजी नगरसेविका सारिका सस्ते यांनी आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले. आता रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. त्यामुळे शिवशंभो कॉलनीतील पाणी आणि रस्त्याचा प्रश्न सुटल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले आहे.
समाविष्ट गावांमध्ये २००० नंतर मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले. २००० ते २०१४ पर्यंत या भागात नागरिकरणाच्या तुलनेत पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे निर्माण झाल्या नाहीत. २०१७ मध्ये महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने समाविष्ट गावांच्या विकासाला चालना मिळाली. पायाभूत सोयी-सुविधा सक्षम केल्यामुळेच ‘‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’’ विकसित झाला. मात्र, आजही खासगी जागामालक, सोसायटीधारक आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयाअभावी काही ठिकाणी रस्त्याची कामे प्रलंबित आहेत. शिवशंभो कॉलनीतील नागरिकांनी याबाबत सातत्त्याने मागणी केली. त्यानुसार, येथील जलवाहिनी आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत पुढाकार घेतला. त्याला यश मिळाले. सोसायटीधारकांच्या हितासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
- – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.