Spread the love

भोसरी : प्रतिनिधी

भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचार, मनमानी कारभार दहशत आणि एकाधिकारशाहीचा कारभार सुरू आहे. करदात्या नागरिकांच्या खिशातील पैसा जागोजागी ओरबडला जात असून, नागरिक पाणी, वीज, रस्ते, खड्डे या प्रश्नांनी वैतागलेले आहेत. या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने ‘परिवर्तन’ करायचे ठरवले आहे. हे परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीची शक्ती एक दिलाने लढणार असून त्यासाठी आमच्यामध्ये एकजूट आहे. आमची ही एकजूट पाहून आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्य संघटक एकनाथ पवार म्हणाले.

 

शिवसेना राज्य संघटक तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे एकनाथ पवार यांच्या निवासस्थानी भोसरी विधानसभा महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेवक आणि भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

 

यावेळी एकनाथ पवार म्हणाले महाराष्ट्राच्या विधानसभेचे बिगुल वाजण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे . विरोधकांकडून जाणीवपूर्वक काही गोष्टींना खतपाणी दिले जात आहे. उगाचच काही वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये फूट पाडणे आता विरोधकांना शक्य नाही. महाविकास आघाडी एक दिलाने, एकजुटीने सर्वत्र काम करणार आहे.  भोसरी विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद राहणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जो उमेदवार भोसरी विधानसभेसाठी ठरविण्यात येईल त्या उमेदवाराचे आम्ही एकजुटीने काम करणार आहोत.

 

दरम्यान या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड ”व्हायरल” झाला. महाविकास आघाडीच्या एकजुटीचे नेटकऱ्यांनी स्वागत केले.

 

भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग हा कधीच पक्षाशी,  पक्षाच्या तत्त्वांशी गद्दारी करत नाही. हा या मतदार संघाचा इतिहास आहे. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता-  पदाधिकारी या मतदारसंघात महाविकास आघाडीचेच काम करेल, असा विश्वास एकनाथ पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

 

भोसरी मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी महापालिकेने दिला. मात्र त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाला नाही. हे या मतदारसंघांमध्ये फिरल्यानंतर नक्कीच दिसून येते. नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था दिसून आली.  संपूर्ण मतदारसंघ खड्डेमय झाला.  यातूनच झालेल्या कामाची गुणवत्ता आणि त्यावर खर्च करण्यात आलेला पैसा यातील तफावत दिसून येते. नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही.  सोसायट्यांमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांवर ‘परिवर्तन’ हे एकच उत्तर आहे.

-अजित गव्हाणे

माजी अध्यक्ष, स्थायी समिती  पिंपरी चिंचवड महापालिका

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *