Spread the love

आमदार महेश लांडगे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक

पिंपरी । प्रतिनिधी

चिखली घरकूल येथील पायाभूत सोयी-सुविधा आणि समस्यांबाबत ‘फास्ट ट्रॅक’ वर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहे.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाने आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना घर मिळावे. या उद्देशाने २००८ मध्ये ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत चिखली से. १७/१९ नेवाळे वस्ती या ठिकाणी ६ हजार ७२० घरांची निर्मिती करण्याची योजना आणली आहे. २०१४ मध्ये या प्रकल्पातील लाभार्थींना घरांचे वाटप करण्यात आले. मात्र, प्रकल्पाच्या ‘डिझाईन’प्रमाणे सोयी-सुविधा विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे घरकुलच्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

 

या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, घरकुलमधील प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर धुरी, उपोषणकर्ते अशोक मगर यासह सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

 

आमदार महेश लांडगे म्हणाले की, चिखली घरकुल प्रकल्पाची निर्मिती करताना तेथील भौगोलिक स्थिती आणि भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि परिसराचा विकास याचा विचार करुन प्रकल्प उभारला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यापेक्षा सखल भागात प्रकल्प उभारला आहे. परिणामी, पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या, ड्रनेज समस्या यासह पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यात अनेक अडचणी आहेत. याबाबत आम्ही सातत्त्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.

 

महापालिका आयुक्तांचा ‘ॲक्शन प्लॅन’…

घरकुलमधील समस्यांबाबत अशोक मगर यांनी बुधवारी घरकुलच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले होते. यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि या प्रश्नाबाबत तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज आयुक्त कार्यालयात बैठक झाली. यावेळी गेल्या पाच वर्षांच्या काळात घरकुलवासीयांना पायाभूत सोयी-सुविधा देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात तत्कालीन आयुक्तांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. गेल्या दोन वर्षांपासून विविध मुद्यांवर प्राधान्याने काम करणे सुरू आहे. आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून भाजी मंडई सुरू करण्यात येईल. सांस्कृतिक भवन निवडणूक कार्यालयाच्या ताब्यात आहे. निवडणुकीनंतर ते घरकुलवासीयांसाठी खुले करण्यात येईल. ड्रेनेज लाईन नवीन टाकण्यात येणार आहे. सीमाभिंत बांधून देण्यात येईल. आगामी दोन दिवसांत ड्रेनेज आणि सीमाभिंतीचे काम, स्ट्रॉम वॉटरच्या मोठ्या लाईने काम सुरू होईल. पुढच्या वर्षी घरकुलमध्ये पावळ्यात पाणी साचणार नाही. याप्रमाणे ‘ॲक्शन प्लॅन’ करण्यात येईल. तसेच, घरकुल वासीयांच्या १० वर्षांच्या टॅक्स माफीबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, असे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहे.

 

चिखली घरकूलमधील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत आहोत. प्रकल्पाला तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे काही समस्या वर्षांनुवर्षे रखडलेल्या आहेत. आज घरकूल येथील शिष्टमंडळासोबत आयुक्त व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. तसेच, घरकुलच्या समस्या कालबद्ध नियोजन करून मार्गी लावण्याबाबत सूचना केली आहे. घरकुलमधील सर्वसामान्य नागरिकांना सक्षमपणे सोयी-सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *