खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश; लोकल सेवा सुधारण्यास मिळणार गती
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पुणे ते लोणावळा या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला अखेर गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी सुमारे ५१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग हा मुंबई-पुणे दरम्यानच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विद्यमान दोन रेल्वे ट्रॅकवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. त्यामुळे लोकल गाड्या उशिरा धावणे, गर्दी वाढणे आणि प्रवाशांना होणारी गैरसोय यासारख्या समस्या निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर तिसरा आणि चौथा ट्रॅक उभारण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.
केंद्र सरकारने २०१४-१५ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर प्रकल्पाचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला. सुरुवातीला या कामाचा अंदाजे खर्च सुमारे २१०० कोटी रुपये होता. मात्र कालांतराने खर्च वाढत गेला. २०२२ पर्यंत तो २२०० कोटी रुपयांवर पोहोचला, तर सध्या भूसंपादनासह संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
या प्रकल्पाचा खर्च ५० टक्के केंद्र सरकार आणि ५० टक्के राज्य सरकार अशा पद्धतीने उचलण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वाट्यातील निधीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचाही सहभाग असणार आहे. मात्र राज्य सरकारकडून निधीबाबत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता.
दरम्यान, राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रकल्पासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशीही या विषयावर चर्चा करण्यात आली होती.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ५१०० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकल गाड्यांची संख्या वाढवणे शक्य होणार असून गाड्या वेळेत धावण्यास मदत होईल. नोकरदार आणि विद्यार्थ्यांना वेळेत कार्यालय व महाविद्यालयात पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून, हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी पुढील पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
About The Author

