Spread the love

खुनाचा गुन्हा दाखल करण्याची हुलावळे कुटुंबीयांची मागणी

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीलगत असलेल्या हिंजवडी परिसरात जमीन वादाचे प्रकरण चिघळल्याचे समोर आले आहे. जमीन प्रकरणी न्यायालयीन दावे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे, जमीन ताब्यात देण्यास भाग पाडणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत हुलावळे कुटुंबीयांनी थेट पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. संबंधित व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात विशाल दत्तात्रय हुलावळे, विवेक अर्जुन हुलावळे आणि अर्जुन महतु हुलावळे (रा. हिंजवडी, ता. मुळशी) यांनी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिंजवडी येथील गट क्रमांक ६० मधील शेतीजमीन त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची असून त्या संदर्भात दिवाणी न्यायालयात विविध दावे प्रलंबित आहेत. मात्र काही व्यक्तींनी खोटे व बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

फिर्यादींच्या मते, त्यांनी कधीही संपूर्ण जमीन हस्तांतरित करण्यास संमती दिलेली नसताना काही आरोपींनी ७/१२ उताऱ्यावर स्वतःच्या नावाची नोंद करून घेतली. या संदर्भातील खरेदीखत रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालय तसेच महसूल न्यायालयात अपील प्रलंबित असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

तसेच मे २०२५ मध्ये फिर्यादी घरात नसताना तीन ते चार अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरी आल्या आणि कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. “ही जमीन आम्ही लवकरच ताब्यात घेणार आहोत, मध्ये आल्यास खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवू,” अशी धमकी देण्यात आली. तसेच पोलिसांशी ‘सेटिंग’ असल्याचे सांगून दबाव टाकण्यात आल्याचा दावा हुलावळे कुटुंबीयांनी केला आहे.

हुलावळे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात सतत होणाऱ्या मानसिक त्रास आणि दबावामुळे कै. दत्तात्रय म्हातु हुलावळे यांचा १० सप्टेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला. तसेच कै. काळुराम म्हातु हुलावळे यांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दोन्ही मृत्यूंसाठी संबंधित आरोपी जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित जमीन सध्या हुलावळे कुटुंबीयांच्या प्रत्यक्ष ताब्यात असून त्या ठिकाणी बोअरवेल, वीजजोडणी तसेच बांधकाम आहे. काही भाडेकरू ‘लिव्ह अँड लायसेन्स’ करारानुसार तेथे वास्तव्यास असल्याचेही त्यांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणात अविनाश गणपत पाटील, विजय विष्णू प्रसाद मर्दा, मयूर वसंतलाल शेठिया, श्रीपाद विमलचंद मेहता आणि दत्तात्रय मारुती मोरे यांच्याविरुद्ध यापूर्वीही पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे हुलावळे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी पोलिस आयुक्तांकडे लेखी निवेदन देत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच विजय मर्दा याच्यावर अहिल्यानगर येथे डॉक्टरांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असून त्याला अटकही झाल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित सर्व आरोपींवर जीवे मारण्याची धमकी, फसवणूक, जबरदस्ती तसेच मृत्यूस कारणीभूत ठरणे या गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी हुलावळे कुटुंबीयांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *