Spread the love

मावळ तालुका वधू-वर सूचक मंडळाचा पुढाकार; सुशीला मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान आयोजन

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

समाजातील तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी मिळावा, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून मदत मिळावी या उद्देशाने मावळ तालुका वधू-वर सूचक मंडळ, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने भव्य वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार (दि. १५ मार्च २०२६) रोजी तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बांदल यांनी दिली.

या मेळाव्यास मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, रोटरी क्लब तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे, क्लबचे अध्यक्ष भगवान शिंदे, प्रसिद्ध लेखक, वक्ते व वैद्यकीय चिकित्सक डॉ. शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, गणेश भेगडे, इंदर ओसवाल, वडगाव नगराध्यक्षा अबोली ढोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विवाहयोग्य तरुण-तरुणींना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि योग्य जोडीदार शोधण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. यामध्ये वधू-वर नोंदणी, सभासद नोंदणी, तसेच पालक व कुटुंबीयांना बैठकीच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात वधू परिचय मेळाव्याने होणार असून त्यानंतर वरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. दोन्ही सत्रांनंतर इच्छुक कुटुंबीयांची स्वतंत्र बैठक आयोजित करून पुढील संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भविष्यात या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू जोडप्यांचे सामुदायिक विवाह रोटरी क्लबच्या सहकार्याने आयोजित करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.

समाजामध्ये आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागावी, तसेच समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे घडावे, या उद्देशाने मंडळ सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे अध्यक्ष पांडुरंग बांदल यांनी सांगितले.

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष नवनाथ कुल, गंगाराम भेगडे, सचिव रूपाली दाभाडे, खजिनदार देवेंद्र बारमुख, दिलीप चौधरी, ॲड. धनंजय कोद्रे, ॲड. भक्ती दाभाडे, नेहा गराडे, रविंद्र पानसरे, अशोक नाटक, सतीश गराडे, अतुल सातकर, मीरा फल्ले, गणेश बांदल, गणपत काळोखे, पोपटराव भेगडे, नामदेव भेगडे, तानाजी काकडे, मधुकर पानसरे, साहेबराव दाभाडे, शोभा दळवी, सीमा अंभुरे, रमाकांत कवितके, प्रकाश भेगडे, रंगनाथ चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *