Spread the love

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी समाज विकास विभागामार्फत कार्यरत आहे. शहरातील महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महानगरपालिकेने यंदा ८३ कोटी रुपयांचा भरीव निधी दिला आहे. महापालिका सक्षमा प्रकल्पाच्या अंतर्गत शहरातील महिला बचत गटांना सक्षम करत आहे असे सांगून महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून महिला बचत गटांना बिल वाटपाचे काम देण्यात येते. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झालीआहे. जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अ‍ॅड.गोरक्ष लोखंडे,माजी नगरसदस्या उषा मुंढे,अनुराधा गोरखे,अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे,सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,प्रशासन अधिकारी पूजा दूधनाळे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटातील महिला मोठ्या उपस्थित होत्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अ‍ॅड.गोरक्ष लोखंडे यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्राच्या मातीला महिलांच्या शौर्याचा मोठा इतिहास आहे. स्वराज्य निर्माणाची छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आपला ठसा उमटवला. स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींच्या शिक्षणासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अनमोल आहे,’ असे सांगतानाच लोखंडे पुढे म्हणाले, ‘आपल्या घरतील महिला घऱातील प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श असते. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर महापुरुषांनी महिला सक्षमीकरणासाठी, महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य खूपच मोठे आहे,’ असेही ते म्हणाले.

माजी महापौर माई ढोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिलांना पाकशास्त्र, शिवणकाम आदींचे प्रशिक्षण देते. अजूनही नवीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. शिक्षणाची आवड असणाऱ्या महिलांनी महापालिकेच्या विविध प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. स्वतच्या पायावर उभे राहिले पाहिजे. निरोगी रहा ,आनंदी रहा, हसत रहा,’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक तसेच पोर्णिमा भोर यांनी केले तर प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *