Spread the love

सव्वातीन लाख करदात्यांनी घेतला १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ; आणखी पाच दिवस बाकी

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने ३० जून २०२५ पर्यंत विविध कर सवलती जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत जवळपास सव्वा तीन लाख नागरिकांनी य सवलतींचा लाभ घेतला आहे. आता या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असून नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर भरावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी ३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कराचा भरणा ऑनलाइन स्वरूपात केल्यास १० टक्के सवलत व कुटुंबातील महिलेच्या नावावर असलेल्या एका निवासी मालमत्तेवर ३० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यासोबतच, आतापर्यंत ३२ हजार ५०५ थकबाकीदारांना जप्तीपूर्वीची नोटीस देखील बजाविण्यात आली आहे.

१ एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत सुमारे ३ लाख १८ हजार मालमत्ताधारकांनी आपला कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल ४०८ कोटी ७३ लाख रुपयांचा कर संकलित झाला आहे. यामध्ये १० टक्के सवलतीचा लाभ घेणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या जवळपास २ लाख ३२ हजार ७६ असून त्यांनी ऑनलाईन भरणा केलेल्या कराची रक्कम २४६.१८ कोटी आहे.

तसेच ज्या मालमत्ताधारकांनी धनादेशाद्वारे कराचा भरणा केला, परंतू त्यांचे धनादेश वटले नाहीत, अशा मालमत्तांवर लवकरच जप्तीची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये न वटलेल्या धनादेशांची एकूण रक्कम ९ कोटी १५ लाख रुपये इतकी असून मालमत्ताधारकांनी ३० जूनपूर्वी आपला मालमत्ता कर ऑनलाईन किंवा रोख स्वरूपात भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

विविध उपक्रमातून जनजागृती

कर वसूल करण्यासाठी विभागाच्या वतीने एसएमएस, कॉलिंग, जनजागृती, होर्डिंग आणि समाज माध्यमे यामधून मोठ्या प्रमाणात प्रचार व जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अद्यापही ज्या थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांच्यावर लवकरच जप्ती अधिपत्र बजावण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच अशा थकबाकीदारांवर केव्हाही जप्तीची कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये निवासी मालमत्ताधारकांचे वाहन, टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू जप्त करण्यात येणार असल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

१९ हजार ६५१ थकबाकीदारांकडून कर वसुली

करसंकलन विभागाने कर वसुलीसाठी विविध माध्यमातून जनजागृती केल्याने आतापर्यंत सुमारे १९ हजार ६५१ थकबाकीदारांकडून ४० कोटी ३३ लाखांचा करसंकलीत झाला आहे. त्यासोबतच ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील करदात्यांनी सवलत योजनेस उत्तम प्रतिसाद दिला असून सवलतीचा लाभ घेतला आहे. परंतू अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही, अशा मालमत्ताधारकांना सवलत घेण्याची शेवटची संधी आहे. त्याबरोबरच जे या तिमाहीमध्ये कराचा भरणा करणार नाहीत, अशा मालमत्ताधारकांच्या करावर पुढील महिन्यापासून विलंब दंड लागू होणार आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता सुध्दा जप्त करण्याची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. नागरिकांनी तात्काळ कराचा भरणा करुन सवलतीचा लाभ घ्यावा. 

-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *