मविआत काँग्रेस ‘वापरा आणि फेका’च्या भूमिकेत
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
राज्यसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत (मविआ) सुरू असलेल्या अंतर्गत हालचालींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा देत प्रियांका चतुर्वेदींचे नाव बाजूला सारण्याचा डाव खेळून राऊतांनी थेट आदित्य ठाकरे यांनाच शह दिला, असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, प्रियांका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. अशा परिस्थितीत त्यांचे नाव डावलून शरद पवार यांचे नाव पुढे रेटून राऊतांनी ‘आपण आदित्य ठाकरेंना किती महत्त्व देतो’ हेच दाखवून दिले आहे. प्रियांकांना यंदा राज्यसभेची संधी मिळाली असती, तर राऊतांची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी झाली असती—ही बाब लक्षात घेऊनच राऊतांनी ही चाल खेळली, असा आरोपही त्यांनी केला.
मविआतील समीकरणांवर बोट ठेवत बन म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्यसभेत संधी मिळावी अशी इच्छा असली तरी वास्तव वेगळे आहे. मविआमध्ये काँग्रेसचे स्थान नगण्य असून ना राज्यसभेत ना विधान परिषदेत काँग्रेसला उमेदवारी मिळणार आहे. राज्यसभेसाठी शरद पवार आणि विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांची वर्णी लागणार असल्याचा दावा करत, मविआत काँग्रेसचा ‘वापरा आणि फेका’ असा वापर होत असल्याचा प्रहार त्यांनी केला.
एनसीपी नेते रोहित पवार यांच्यावरही बन यांनी टीका केली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार रोज पत्रकार परिषद घेत असून न्यायासाठी नव्हे, तर या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत आणि रोहित यांच्या कथित भेटींवरून खिल्ली उडवत, “राऊतांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित रोज भोंगा वाजवत आहेत,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित करताना राऊतांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूंवर निशाणा साधल्याचा आरोपही बन यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकली असल्याचे सर्वांना ठाऊक असताना हा टोला थेट ठाकरेंनाच असल्याचे ते म्हणाले. मराठीबद्दल प्रेम व्यक्त करताना पत्रकार परिषदांमध्ये भाजप नेत्यांवर टीका करताना वापरल्या जाणाऱ्या भाषेवर संयम ठेवावा, अन्यथा मराठी भाषेचा अवमान होतो, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
एकूणच, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मविआतील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले असून, पुढील काळात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
About The Author

