Spread the love

अनवाणी पायांनी ४२ किमी मॅरेथॉन जिंकत रुक्मिणी दांगटे यांचा प्रेरणादायी विजय

पालघर : प्रतिनिधी

पंजाब राज्यात मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या ४२ किलोमीटर ‘वीर भगतसिंग नॅशनल मॅरेथॉन स्पर्धा–२०२६’ मध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील सावरपाडा या अतिदुर्गम गावातील रुक्मिणी अनेश दांगटे हिने महिलांमधून प्रथम क्रमांक पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तिची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

रुक्मिणी दांगटे हिचे आयुष्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले आहे. सावरपाडा सारख्या दुर्गम भागात शेतावर लहानशा झोपडीत कुटुंबासोबत राहणारी रुक्मिणी, रोजंदारीवर शेतमजुरी करून संसाराचा गाडा चालवते. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी आईची जबाबदारी सांभाळत, घरची आर्थिक अडचण आणि कष्टप्रद जीवन यांना तिने कधीही आड येऊ दिले नाही.

विशेष म्हणजे, रुक्मिणीने अनेक वेळा अनवाणी पायाने धावत मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. अत्यल्प साधनसामग्री, योग्य सुविधा किंवा प्रशिक्षक नसतानाही, तिने आपल्या जिद्दीच्या बळावर राज्यभरातील अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेळ मिळेल तेव्हा सराव, आणि बाकी वेळ कष्ट—अशी तिची दिनचर्या आज तिच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली आहे.

४२ किलोमीटरच्या अत्यंत कठीण अशा मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत रुक्मिणीने केवळ स्वतःचेच नव्हे, तर पालघर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. तिच्या या विजयामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

रुक्मिणीच्या या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. करतोड-सावरपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप विष्णू माळी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, “रुक्मिणी ताईचा संघर्ष आम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतही तिने जिद्द सोडली नाही. तिचे यश हे संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद आहे.”

रुक्मिणी दांगटे हिची ही कामगिरी केवळ एक विजय नाही, तर कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांची जिवंत उदाहरण आहे. तिची यशोगाथा ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी ठरत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *