पाच वर्षांच्या कठोर परिश्रमाला यश; शिस्त, मेहनत आणि जिद्दीची मिळाली दखल
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
आर्यन्स मार्शल आर्ट्स संस्थेसाठी अभिमानाचा क्षण ठरावा असा सोहळा नुकताच पार पडला. संस्थेतील तब्बल १० खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ब्लॅक बेल्ट मिळवण्याचा मान मिळवला. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या खेळाडूंनी ही यशाची शिखरे गाठली आहेत.
ब्लॅक बेल्ट हा केवळ एक दर्जा नसून तो खेळाडूंच्या चिकाटीचा, संयमाचा आणि आत्मनियंत्रणाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे हा मान मिळवणे म्हणजे मोठी जबाबदारी स्वीकारणेही होय.
ब्लॅक बेल्ट प्राप्त करणाऱ्या खेळाडूंमध्ये अमित लोहार, समीर लोहार, मयूर गुंटी, अवि वाघमारे, ओमकार खोबरे, सुजल धूपधुळे, भावना बोराटे, स्वानंद जोडगे, प्रीत पाटील आणि समर्थ जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशामुळे संस्थेचे तसेच परिसराचे नाव उज्ज्वल झाले आहे.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक आदित्य अडागळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनीही त्यांना वेळोवेळी प्रेरणा दिली. त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळेच खेळाडूंना हा यशाचा टप्पा गाठता आला.
ब्लॅक बेल्ट प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदस्य हेमंत हरहरे आणि तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू आप्पा कदम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिन भगवान यांनी प्रभावीपणे केले.
या यशामुळे संस्थेतील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून, भविष्यात अधिक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
About The Author

