Spread the love

पालघर | प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी एक प्रेरणादायी घटना नुकतीच घडली आहे. जिल्हा परिषद पालघरच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) तर्फे सन २०२५ चा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून, जव्हार तालुक्यातील जि.प. शाळा आयरे येथील प्राथमिक सहशिक्षक अनंता पांडुरंग महाले यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

अत्यंत साध्या आणि गरीब कुटुंबातून आलेल्या अनंता महाले यांनी आपल्या जिद्दीच्या आणि अथक परिश्रमांच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय स्थान मिळवले आहे. कठीण परिस्थितीतही शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी स्वतःला घडवले आणि आज ते विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.

महाले यांची ओळख केवळ शिक्षक म्हणून नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे मार्गदर्शक म्हणून आहे. वेळेचे काटेकोर पालन, शांत आणि संयमी स्वभाव, तसेच विद्यार्थ्यांशी जपलेले आत्मीय नाते यामुळे त्यांनी शाळेत एक वेगळी छाप निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.

शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा व्हावी यासाठी महाले यांनी विविध अभिनव पद्धतींचा अवलंब केला. विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यात विचारशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्येही त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृह (२१२) येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षण अधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते अनंता महाले यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पुरस्कारामुळे अनंता महाले यांच्या कार्याला अधिक व्यापक मान्यता मिळाली असून, त्यांच्या यशामुळे इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत राहिल्यास नक्कीच यश मिळते, याचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *