दापोडीतील आनंदवन प्रकल्प ठरला जनजागृतीचा केंद्रबिंदू
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात उत्साहात आणि नवकल्पनांनी साजरा करण्यात आला. नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले पथनाट्य उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. या सादरीकरणातून शून्य कचरा व्यवस्थापनाची संकल्पना, ओला-सुक्या कचऱ्याचे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी, तसेच कापडी पिशव्यांच्या वापराचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले.
‘आर.आर.आर. (Reduce, Reuse, Recycle) सेंटर’ची संकल्पना आणि घरगुती कंपोस्टिंगचे फायदेही नाट्यमय पद्धतीने सादर करण्यात आल्याने नागरिकांना विषय अधिक समजण्यास मदत झाली.
यावेळी उपस्थितांना आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि पुनर्वापर यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेचे प्रयत्न अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रक्रियांबाबत जाणून घेतले.
या उपक्रमासाठी महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तसेच उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने नियोजनबद्ध कामगिरी बजावली.
त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत विविध जनजागृती उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
या कार्यक्रमास सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, दीपक कोटीयाना, तसेच आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, नितीन तुपे, सचिन जाधव, ओंकार शिवणकर यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये ‘झिरो वेस्ट’ जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे भविष्यात पिंपरी चिंचवड शहर कचऱ्याविरहित आणि अधिक स्वच्छ, हरित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
About The Author

