Spread the love
कलापिनीचा एकांकिका महोत्सव उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
कै. रजनी नागेश धोपावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘कलापिनी एकांकिका महोत्सवा’ने तळेगावातील सांस्कृतिक वातावरण भारावून टाकले. कलापिनी सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याने रसिकांना दर्जेदार नाट्यअनुभव दिला.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्या स्मिता नाईक, अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अशोक बकरे तसेच धोपावकर ट्रस्टचे विश्वस्त कौस्तुभ ओक आणि सतीश साठे यांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला.
अंजली कऱ्हाडकर, विजय कुलकर्णी आणि ऋचा पोंक्षे यांनी रंगभूमीशी असलेले आपले नाते आणि नाट्यप्रवासातील अनुभव व्यक्त केले. धोपावकर ट्रस्टतर्फे कौस्तुभ ओक यांनी स्मरणरंजन करत आदरांजली अर्पण केली.
प्रमुख पाहुण्या स्मिता नाईक यांनी तळेगावच्या सांस्कृतिक परंपरेचे कौतुक करत, “५० वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेली संस्था हे तळेगावचे भाग्य आहे,” असे गौरवोद्गार काढले.
“Right to Pee” या पथनाट्याने प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी जागर निर्माण केला. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणानंतर सर्व प्रेक्षकांनी उभे राहून स्वच्छतेची शपथ घेतली, हे या प्रयोगाचे यश ठरले.
“श्री तशी सौ” या दोन पात्रांच्या नाटकात विजय आणि माधुरी कुलकर्णी यांनी हलक्या-फुलक्या शैलीत वैवाहिक जीवनातील प्रसंग रंगवले. त्यांच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले.
“टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन” या दीर्घांकाने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. १६ कलाकारांच्या दमदार सादरीकरणातून स्वप्न, वास्तव आणि समाजातील संवेदनशून्यता यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. कै. जयंत पवार लिखित या नाटकाचे दिग्दर्शन संदीप समर्थ यांनी यशस्वीपणे केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना परगी यांनी सुरेखपणे केले, तर आभार प्रदर्शन अंजली सहस्रबुद्धे यांनी केले.
ध्वनी व्यवस्था सुमेर नंदेश्वर यांनी सांभाळली, तर फोटोग्राफी हितेश शिंदे यांनी केली. कलामंडळ प्रमुख चेतन शहा, संजय मालकर आणि इतर सदस्यांच्या मेहनतीमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
हा महोत्सव केवळ नाट्यप्रयोगांचा नसून सामाजिक जाणीवा जागृत करणारा आणि तळेगावच्या सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारा ठरला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *