Spread the love

यशवंतनगर परिसरातील एकमेव मैदान कायम क्रीडांगण म्हणून राखण्याची जोरदार मागणी

तळेगाव दाभाडे | प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगरमधील गोळवलकर गुरुजी मैदान, ज्याला स्थानिक स्तरावर “गोल ग्राऊंड” म्हणून ओळखले जाते, हे मैदान खेळाडूंसाठी कायमस्वरूपी आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. परिसरातील खेळाडू, पालक आणि नागरिकांनी एकत्र येत नगर परिषदेकडे यासाठी ठाम भूमिका मांडली आहे.

गेल्या तीन दशकांपासून या मैदानावर क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो यांसारखे विविध मैदानी खेळ नियमित खेळले जात आहेत. यशवंतनगर, तपोधाम कॉलनी आणि तळेगाव स्टेशन परिसरातील सुमारे २० हजार लोकसंख्येसाठी हे एकमेव उपलब्ध क्रीडांगण आहे. त्यामुळे या मैदानाचे जतन करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांत या मैदानावर आठवडी बाजार, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम, वाहन पार्किंग आणि इतर अनधिकृत वापर वाढल्यामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मैदानात खड्डे, कचरा आणि विद्यमान स्टेजमुळे खेळासाठीची जागा कमी झाली असून, सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून २०२५-२६ साठी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, या निधीचा वापर खेळाडूंच्या हितासाठीच व्हावा, अशी नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे.

या मागण्यांसाठी स्थानिकांनी आमदार सुनील अण्णा शेळके, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, तसेच नगरसेवकांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

“या मैदानामुळेच आमच्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली क्रीडांगण कमी होऊ नये,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून, गोल ग्राऊंडला खऱ्या अर्थाने खेळाडूंचं मैदान म्हणून जपावं, अशी अपेक्षा आता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

◼️मैदानाची अधिकृत नोंद “क्रीडांगण” म्हणून करावी

◼️केवळ क्रीडा सुविधांवरच खर्च करावा

◼️विद्यमान स्टेज हटवून मोकळी जागा वाढवावी

◼️क्रिकेट पीच, प्रकाशयोजना, सुरक्षा भिंत, स्वच्छतागृह उभारावे

◼️आठवडी बाजार अन्यत्र हलवावा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *