Spread the love

कलापिनीच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त रंगला अनुभवांचा आणि सर्जनशीलतेचा सोहळा

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

कलेच्या प्रवासात यशस्वी व्हायचे असेल, तर शॉर्टकटचा मोह टाळून सातत्यपूर्ण मेहनतीचा मार्ग स्वीकारणे अत्यावश्यक आहे, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दिला. कलापिनी संस्थेच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. त्यांच्या साध्या पण प्रभावी शब्दांनी उपस्थित रसिक, नवोदित कलाकार आणि कला प्रेमींना नवी दिशा मिळाली.

“तुम्हाला जे करावसं वाटतं त्याचा प्रामाणिकपणे पाठपुरावा करा. कोणत्याही क्षेत्रात भावना आणि बुद्धी या दोन्हींचा समतोल साधणे गरजेचे आहे,” असे सांगताना प्रभावळकर यांनी अभिनय क्षेत्रातील स्वतःचे अनुभवही रंगतदार शैलीत मांडले. दिग्दर्शक हा एखाद्या जहाजाचा कॅप्टन असतो आणि त्याच्या दृष्टिकोनाचा आदर राखणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘दशावतार’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘चिमणराव’, ‘चौकटराजा’ यांसारख्या विविध भूमिकांचा प्रवास सांगताना त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेने आपल्यावर कसा परिणाम केला, याचे प्रभावी चित्रण केले. त्यांच्या अनुभवकथनात विनोदाची झालर असल्यामुळे संपूर्ण संवाद अधिकच रंगतदार ठरला. उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला दिग्दर्शक सुबोध खानोलकर, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, वृषालीराजे दाभाडे सरदार, दिव्यलेखाराजे दाभाडे सरदार, संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, डॉ. अनंत परांजपे, श्रीशैल गद्रे, अंजली सहस्रबुद्धे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाची सुरुवात संगीत आणि नृत्याच्या सादरीकरणाने झाली. वादिराज लिमये लिखित आणि विनायक लिमये संगीतबद्ध गीत तसेच ‘दशावतार’ चित्रपटातील ‘गोड मानुनी घे रंगपूजा’ या गीतावर किर्ती पेडणेकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने वातावरण भारावून गेले.

वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना गौरव पुरस्कार देण्यात आले. बालकलाकारांपासून ते अनुभवी रंगकर्मीपर्यंत अनेकांना सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळाली.

मनोगतात बोलताना सुबोध खानोलकर यांनी ‘दशावतार’ चित्रपटाचे सर्वप्रथम कौतुक कलापिनीनेच केल्याचे सांगत, हा सन्मान घरच्यांकडून मिळाल्यासारखा असल्याची भावना व्यक्त केली. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करत, “एवढी मोठी संस्था उभी करणे आणि टिकवणे सोपे नाही,” असे नमूद केले.

संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी कलापिनीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर डॉ. अनंत परांजपे यांनी वर्धापनदिनाला ‘बूस्टर डोस’ संबोधत, “कलापिनी ही मावळातील कलाकारांसाठी एक सुरक्षित बंदर आहे,” असे सांगितले.

प्रवेशद्वारावर कलापिनीच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा देणारे आकर्षक फोटो प्रदर्शनही उभारण्यात आले होते. यामुळे संस्थेच्या सांस्कृतिक योगदानाची झलक पाहायला मिळाली.

माधुरी ढमाले–कुलकर्णी आणि लीना परगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. विनया केसकर आणि विराज सवाई यांनी प्रकट मुलाखत घेतली, तर अंजली सहस्रबुद्धे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. हेमंत झेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमांमुळे हा वर्धापन दिन सोहळा अविस्मरणीय ठरला. कला, संस्कृती आणि प्रेरणेचा संगम असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *