Spread the love

११ व १२ एप्रिलला शहरभर कॅम्प; नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना या मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली.

उपविभागीय अधिकारी नवले यांनी सांगितले की, मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा पाया असल्यामुळे तिची अचूकता आणि अद्ययावतपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या पुनर्निरीक्षण प्रक्रियेत सहभागी होऊन आपली नोंदणी, दुरुस्ती आणि अद्ययावत माहिती तपासून घेणे गरजेचे आहे. तसेच, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नगरसेवकांना केले.

 

या मोहिमेअंतर्गत ११ आणि १२ एप्रिल २०२६ रोजी शहरातील विविध ठिकाणी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये नागरिकांना मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल, तसेच इतर आवश्यक सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या प्रभागातील जवळच्या केंद्रावर भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

शहरातील सरस्वती विद्यामंदिर, एम.आय.टी. कॉलेज, इंद्रायणी महाविद्यालय, संत ज्ञानेश्वर शाळा, आदर्श शाळा, परांजपे शाळा, सह्याद्री विद्यालय, बालविकास शाळा, वीर जिजामाता शाळा, सुभाष मार्केट, कैकाडी समाज मंदिर, जैन इंग्लिश मीडियम स्कूल आदी ठिकाणी हे कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र केंद्र निश्चित करण्यात आले असून, नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने सेवा मिळेल याची दक्षता घेण्यात आली आहे.

 

या बैठकीस नगराध्यक्ष संतोष दाभाडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, बांधकाम सभापती सुदाम शेळके, स्वच्छता व जलनिस्सारण समिती सभापती निखिल भगत, महिला व बालकल्याण सभापती शैलाजा काळोखे, उपसभापती शोभा परदेशी तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.

 

नगरपरिषद प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे. नागरिकांचा सहभागच या मोहिमेच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *