अविनाश-विश्वजीत यांच्या सादरीकरणाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा दिमाखदार समारोप; संगीत, साहित्य आणि काव्याचा अनोखा संगम
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
मराठी भाषेचा गोडवा, भावस्पर्शी गीतांचे शब्द आणि सुरेल संगीताची जादू… अशा बहारदार वातावरणात रसिकांना मंत्रमुग्ध करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा दिमाखदार समारोप झाला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अविनाश-विश्वजीत यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रिय मराठी गीतांच्या सादरीकरणाने प्रेक्षागृहात उत्साह, भावुकता आणि आनंदाची लहर निर्माण झाली. संगीताच्या माध्यमातून मराठी भाषेचे सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धी अनुभवण्याची संधी या मैफिलीने रसिकांना दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली हा सप्ताह आयोजित करण्यात आला. मराठी भाषेचा वारसा, साहित्यपरंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाची सांगता सुरेल मैफिलीने झाली.
मैफिलीचा प्रारंभ ‘मोगरा फुलला’ या गीताने झाला. पहिल्याच गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर ‘का कळेना’, ‘कधी तू’, ‘भेटला विठ्ठल’ आणि ‘फूलवंती टायटल साँग’ या गीतांनी वातावरणात रंगत आणली. ‘केव्हा तरी पहाटे’ आणि ‘ओल्या सांजवेळी’ या गीतांमधून प्रेमाच्या नाजूक भावना आणि आठवणींचे हळवे विश्व उलगडले. शब्दांची भावपूर्ण मांडणी आणि संगीताच्या सुरेल साथीमुळे रसिक गीतांमध्ये रमून गेले.
‘फॅन्टॅस्टिक’, ‘मदनमंजिरी’, ‘साथ दे / तुला पाहता’ आणि ‘आदी तूच अंती तूच’ या गीतांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भक्तिभावापासून प्रेमभावनेपर्यंत आणि हळव्या सुरांपासून ठेक्यावरील गीतांपर्यंत विविध संगीतप्रकारांचा आनंद या मैफिलीत अनुभवायला मिळाला.
मध्यंतरानंतर ‘आली ठुमकत नार छौ’, ‘अविनाश इन्स्ट्रुमेंटल’ आणि ‘कुसुमाग्रज… कविता… विश्वजीत’ या सादरीकरणांनी कार्यक्रमाला वेगळी उंची दिली. विशेषतः कुसुमाग्रजांच्या कवितेच्या सादरीकरणातून मराठी साहित्याचे भावविश्व आणि शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित झाले. संगीत आणि साहित्य यांच्या संगमामुळे भाषेच्या अभिजाततेचा प्रत्यय रसिकांना आला.
‘हृदयात वाजे समथिंग’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘असा हा धर्मवीर ट्रॅक’ आणि ‘हंबीर तू’ या गीतांनी मैफिलीचा उत्तरार्ध अधिक रंगतदार केला. अखेरपर्यंत कायम राहिलेला रसिकांचा उत्साह आणि टाळ्यांचा गजर यामुळे प्रेक्षागृहातील वातावरण भारावून गेले.
मराठी भाषेचा गौरव केवळ शब्दांतूनच नव्हे, तर गीत-संगीत आणि साहित्याच्या माध्यमातूनही प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो, याची अनुभूती या मैफिलीने दिली. अविनाश-विश्वजीत यांच्या सुरेल सादरीकरणाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप संस्मरणीय ठरला.
About The Author


