Spread the love

पाच संशयित ताब्यात; १ लाख ४० हजारांच्या दोन मोटारसायकली जप्त, चिखलीसह अन्य पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा छडा

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान संशयित हालचालींवरून पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्या चौकशीतून दोन घरफोडी आणि दोन वाहन चोरीचे असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाला यश आले. पोलिसांनी संशयितांकडून सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-४चे पथक पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिसांना काही जणांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यानुसार रुषीकेश राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे), अशोक राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून डिलक्स कंपनीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये एमएच १३ सीए ८६२८ आणि एमएच १४ बीडब्ल्यू ३९२७ या वाहनांचा समावेश आहे. दोन्ही वाहनांची एकूण किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी संशयितांकडे अधिक तपास केला असता त्यांनी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर उत्तर चाकण आणि उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाहन चोरीचे दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत.

या कारवाईत उत्तर चाकण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ९३०/२०२६ आणि उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १३१/२०२६ हे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच चिखली पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २३९/२०२६ आणि ३८७/२०२६ या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींपैकी तिघांना उत्तर चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, तर अन्य दोघांना वैद्यकीय तपासणीनंतर उत्तर म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले व पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *