आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला पुढील टप्प्यात गती; शिक्षण, संशोधन आणि उद्योगविश्वाला मोठी संधी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात औद्योगिक क्षेत्रासोबतच उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्राची भक्कम ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने मोशी येथे प्रस्तावित भारतीय व्यवस्थापन संस्था (आय.आय.एम.)च्या कॅम्पसच्या हालचालींना वेग आला आहे. आय.आय.एम. पुणे कॅम्पससाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या मोशी येथील जागेची बुधवारी (दि. ७) आय.आय.एम. नागपूरच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील प्रशासकीय प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून पिंपरी-चिंचवडमध्ये आय.आय.एम.सारखी देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन शिक्षण संस्था उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने मोशी येथील शासकीय जमीन आय.आय.एम. नागपूरच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण कॅम्पससाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या जुलै २०२६ मधील प्रसिद्धीपत्रकानुसार, मोशी येथे सुमारे ७० एकर क्षेत्रावर पूर्ण क्षमतेचा शैक्षणिक व निवासी कॅम्पस विकसित करण्याची योजना आहे.
या प्रस्तावित प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आय.आय.एम. नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी, सदस्य प्रा. भीमराया मेट्री, अरुण अनंत व प्रा. प्रशांत गुप्ता, तसेच बांधकाम समितीचे अध्यक्ष वैभव डांगे आणि सदस्य आशु तोमर, प्रा. सोम शेखर भट्टाचार्य व प्रा. राठ यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली.
यावेळी महसूल विभागाचे मंडल अधिकारी श्री. सैद, संबंधित तलाठी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी जगदाळे आणि बोऱ्हाडे यांनी प्रस्तावित जागेची सद्यस्थिती, उपलब्ध क्षेत्र, जमीनविषयक बाबी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रियेची माहिती दिली. आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत गायकवाड यांचीही यावेळी उपस्थिती होती.
स्थळ पाहणीमध्ये केवळ जागेची उपलब्धता तपासण्यापुरता विषय मर्यादित न ठेवता भविष्यातील कॅम्पससाठी आवश्यक पायाभूत सुविधांवरही चर्चा करण्यात आली. शैक्षणिक इमारती, निवासी सुविधा, विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींसाठी आवश्यक व्यवस्था, वाहतूक व कनेक्टिव्हिटी, प्रशासकीय बाबी तसेच भविष्यातील विस्ताराच्या शक्यतांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
मोशी परिसराची पुणे आणि पिंपरी-चिंचवडशी असलेली कनेक्टिव्हिटी तसेच औद्योगिक पट्ट्याशी असलेली जवळीक या प्रकल्पासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आय.आय.एम.सारख्या संस्थेमुळे व्यवस्थापन शिक्षणासोबतच संशोधन, कौशल्यविकास, स्टार्टअप आणि उद्योग-शिक्षण सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
“पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभ्या राहाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आय.आय.एम.सारखी प्रतिष्ठित संस्था शहरात आल्यास त्याचा लाभ केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहणार नाही. व्यवस्थापन शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्याला मोठी संधी मिळेल. प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी हा प्रकल्पाच्या पुढील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन, प्रशासन आणि संबंधित संस्थांच्या समन्वयातून पाठपुरावा सुरू राहील,” असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
About The Author


