Spread the love

श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवात सूर्यकुमार यादवची उपस्थिती; युवा खेळाडूंना ‘देशासाठी खेळा आणि जिंका’चा संदेश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि वेगळ्या शैलीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याच्या उपस्थितीने भोसरी नगरीत उत्साहाला उधाण आले. श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सूर्यकुमार यादव भोसरीत दाखल झाला आणि हजारो क्रिकेटप्रेमींनी ‘SKY… SKY… SKY…’च्या घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून सोडला. यावेळी संवाद साधताना सूर्यकुमारने लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्याचे संकेत दिल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक योगेश लांडगे यांच्या वतीने श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी सूर्यकुमार यादवला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच आलेल्या ‘SKY’च्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

सूर्यकुमार यादवचे उत्सवस्थळी आगमन होताच ढोल-ताशांचा गजर आणि चाहत्यांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक योगेश लांडगे यांनी सूर्यकुमार यादवचे स्वागत केले.

यावेळी बोलताना सूर्यकुमार यादवने पिंपरी-चिंचवडमध्ये येण्याचा आनंद व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी असल्याचे सांगत त्याने या भूमीशी असलेले भावनिक नाते व्यक्त केले. मुंबईहून पिंपरी-चिंचवडपर्यंतचा प्रवास पावसाळी वातावरणातही सुखकर झाल्याचे सांगताना मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी झाल्याचेही त्याने नमूद केले.

आमदार महेश लांडगे यांच्या कार्याचेही सूर्यकुमारने कौतुक केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या कामाबद्दल लांडगे यांचे आभार मानण्यासाठी आपण भोसरीत आलो असल्याचे त्याने सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले आराध्य असल्याचे सांगत त्यांच्या कार्याबद्दलची श्रद्धाही त्याने व्यक्त केली.

दरम्यान, देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देताना सूर्यकुमार यादवने क्रिकेटपुरते मर्यादित न राहता इतर क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करत असल्याचे सांगितले. ऑलिम्पिक, एशियाडसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचा झेंडा उंचावत आहेत. ‘देशासाठी खेळायचं आणि देशासाठी जिंकायचं’ ही भावना प्रत्येक खेळाडूने मनात ठेवावी, असा संदेश त्याने दिला.

भारतीय सण, उत्सव आणि परंपरांबाबतही सूर्यकुमार यादवने आपले विचार मांडले. देशात किंवा परदेशात कुठेही असलो तरी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत सण साजरे करण्याचा आनंद वेगळाच असतो. आपले सण, उत्सव आणि परंपरा हीच भारताची खरी अस्मिता असल्याचे त्याने सांगितले.

सूर्यकुमार यादवसारखा देशाचे नाव जगभरात पोहोचवणारा क्रिकेटपटू पैलवान आणि कबड्डीपटूंच्या भोसरी नगरीत आला, ही अभिमानाची बाब असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. देशासाठी योगदान देणारे खेळाडू हेच खरे ‘रिअल हिरो’ असून, सूर्यकुमार यादवने आपल्या खेळातून लाखो तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्याचे भोसरीतील स्वागत हा आनंद आणि अभिमानाचा क्षण असल्याचे लांडगे यांनी नमूद केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *