पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वाचे दिमाखात उद्घाटन; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार
पुणे : प्रतिनिधी
आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासोबतच देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आवश्यक आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाची वाटचाल करताना भाषा, कला, संस्कृती, परंपरा आणि मूल्यांशी असलेले नाते अधिक दृढ करणे ही विकसित भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चेअरमन मीरा कलमाडी आदी उपस्थित होते.
यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करताना राधाकृष्णन यांनी पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून संबोधले. कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन या विविध क्षेत्रांना एकाच व्यासपीठावर आणत पुणे फेस्टिव्हलने देश-विदेशात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या महोत्सवात २१ देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विकासाचा अर्थ केवळ आर्थिक वाढ किंवा आधुनिक सुविधा एवढाच नसून सांस्कृतिक वारशाचे संवर्धनही त्याचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक शहरे उभारताना त्यांचा सांस्कृतिक आत्मा जपणे आणि नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देतानाच परंपरेचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे फेस्टिव्हलसारखे महोत्सव स्थानिक कलाकार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला संधी देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पुणे फेस्टिव्हलला भविष्यात जागतिक सांस्कृतिक महोत्सव म्हणून विस्तार देण्याची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. महोत्सवाच्या काळात ‘सेवा समर्पण अभियानांतर्गत’ विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे फेस्टिव्हलने गायन, वादन, नृत्य, शास्त्रीय संगीत, लोककला, नाट्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. नवोदित कलाकारांसह महिलांना संधी देणे हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले. महोत्सवासाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पुणे फेस्टिव्हल हे महाराष्ट्राची आणि देशाची सांस्कृतिक ओळख जगासमोर नेणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. ‘वारसा ते विकास’ या संकल्पनेतून परंपरा आणि विकासाची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला.
पुणे फेस्टिव्हलच्या चेअरमन मीरा कलमाडी यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाच्या ३८ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. विविध कला, परंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचा संगम घडविणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांसह रसिकांची मोठी उपस्थिती होती.
About The Author











