बीएसबीडी खात्याची सुविधा; आधार-पॅनच्या आधारे खाते उघडण्याची सोय, चार डेबिट व्यवहार विनाशुल्क
मुंबई : प्रतिनिधी
बँकिंग व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते ही सुविधा उपलब्ध आहे. या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे खाते उघडताना कोणत्याही प्रारंभिक ठेवीची किंवा किमान शिल्लक रकमेची आवश्यकता नसते. त्यामुळे नियमित बचत खात्याची किमान शिल्लक राखण्याची अडचण असलेल्या ग्राहकांसाठी हे खाते उपयुक्त ठरू शकते.
बीएसबीडी खाते उघडण्यासाठी ग्राहकाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा फॉर्म क्रमांक ६० यांचा वापर करता येतो. या खात्यासाठी वय किंवा उत्पन्नाची कोणतीही विशिष्ट अट नसून, पात्र व्यक्ती हे खाते उघडू शकते. त्यामुळे विविध उत्पन्न गटांतील नागरिकांना मूलभूत बँकिंग सुविधांशी जोडण्याचा मार्ग यामुळे उपलब्ध होतो.
विशेष म्हणजे, ग्राहकाच्या विनंतीनुसार त्याचे सामान्य बचत खाते बीएसबीडी खात्यामध्ये रूपांतरित करता येते. बीएसबीडी खाते उघडण्यासाठी सुरुवातीला कोणतीही रक्कम जमा करणे बंधनकारक नाही. तसेच खात्यात पैसे जमा करण्यावर संख्येची मर्यादा नसून, ग्राहक आपल्या गरजेनुसार कितीही वेळा रक्कम जमा करू शकतो.
बीएसबीडी खातेधारकांना एटीएम-कम-डेबिट कार्ड यासारख्या मूलभूत बँकिंग सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, खात्यातून पैसे काढण्याबाबत महिन्याला ठरावीक मर्यादा आहे. खातेधारकांना दर महिन्याला जास्तीत जास्त चार वेळा विनाशुल्क पैसे काढता किंवा डेबिट व्यवहार करता येतात.
या चार विनाशुल्क व्यवहारांमध्ये केवळ एटीएममधून पैसे काढण्याचाच समावेश नसून, आरटीजीएस, एनईएफटी, क्लिअरिंग, इंटरनेट डेबिट, स्थायी सूचना तसेच ईएमआयशी संबंधित डेबिट व्यवहार यांचाही समावेश होतो. त्यामुळे विनाशुल्क व्यवहारांची मर्यादा ग्राहकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
बीएसबीडी खात्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच बँकेत बीएसबीडी खाते असताना त्याच ग्राहकाला नेहमीचे बचत खाते एकाचवेळी ठेवता येत नाही. त्यामुळे खाते निवडताना ग्राहकांनी आपल्या बँकिंग गरजा आणि व्यवहारांचे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे.
एकूणच, किमान शिल्लक न ठेवता खाते चालविण्याची सुविधा, विनाशुल्क डेबिट कार्ड आणि मूलभूत बँकिंग व्यवहारांची उपलब्धता यामुळे बीएसबीडी खाते हे साधे आणि मूलभूत बँकिंग करण्यासाठी एक पर्याय ठरते.
About The Author











