Spread the love

राळेगणसिद्धीत सदिच्छा भेट; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ प्रकल्पाचे अण्णांकडून कौतु

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. सामाजिक, विकासात्मक आणि राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर चर्चा करत आमदार लांडगे यांनी अण्णांचे आशीर्वाद घेतले.

या भेटीला कौटुंबिक स्नेहाचीही पार्श्वभूमी लाभली. आमदार महेश लांडगे यांचे वडील वस्ताद किसनराव लांडगे आणि अण्णा हजारे यांच्यात अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध आहेत. वस्ताद किसनराव लांडगे हे अण्णांची भेट घेण्यासाठी सातत्याने राळेगणसिद्धी येथे जात असत. या जुन्या मैत्रीमुळे लांडगे आणि हजारे कुटुंबीयांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या भेटीदरम्यान जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा म्हणून प्रस्तावित ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आमदार लांडगे यांनी अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधला. प्रकल्पाची संकल्पना, सुरू असलेली कार्यवाही तसेच भावी पिढ्यांसाठी या स्मारकाचे महत्त्व याबाबत त्यांनी अण्णांना माहिती दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या स्मारकाच्या उभारणीच्या संकल्पनेचे अण्णा हजारे यांनी कौतुक केले. सामाजिक आणि राष्ट्रहिताच्या कार्याला प्राधान्य देत सातत्याने कार्यरत राहण्याचा सल्लाही त्यांनी आमदार लांडगे यांना दिला.

अण्णा हजारे यांनी ग्रामविकास, व्यसनमुक्ती, पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीच्या माध्यमातून केलेले कार्य देशभर परिचित आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा संदर्भ देत आमदार लांडगे यांनी अण्णांचे मार्गदर्शन लोकहिताच्या कामासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “माझे वडील वस्ताद किसनराव लांडगे आणि आदरणीय अण्णा हजारे यांच्यात अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे अण्णांसोबत आमचा कौटुंबिक जिव्हाळा आहे. राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आशीर्वाद घेतले. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या उभारणीचे अण्णांनी केलेले कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे मार्गदर्शन लोकहितासाठी अधिक समर्पितपणे काम करण्याची नवी ऊर्जा देते.”

या भेटीमुळे लांडगे आणि हजारे कुटुंबीयांमधील जुना स्नेह अधिक दृढ झाल्याचेही यावेळी अधोरेखित झाले. सामाजिक कार्यातील अनुभवी व्यक्तिमत्त्वाकडून मिळालेले मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे सार्वजनिक जीवनातील कामासाठी महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *