शिवशंभूंचा इतिहास आणि स्वराज्याचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमदार महेश लांडगे यांचा संकल्प
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
दिवाळीच्या प्रकाशपर्वात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला, त्यागाला आणि स्वराज्यनिष्ठेला १००१ दीप प्रज्वलित करून अनोखी मानवंदना देण्यात आली. ‘पहिला दिवा माझ्या राजासाठी’ या संकल्पनेतून मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ स्मारक परिसरात हेल्प फाउंडेशनच्या वतीने दीपोत्सव सोहळा २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या या परिसरात शिवशंभूंच्या इतिहासाचा जागर करण्यात आला. केवळ स्मारक उभारणे नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार पुढील पिढ्यांच्या मनात रुजवणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याची भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
या दीपोत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक स्मारकाला भावनिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. १००१ दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला पुतळा आणि परिसर उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शिवशंभूंचे पराक्रम, त्यांचे बलिदान, धर्मनिष्ठा आणि स्वराज्यासाठीचा संघर्ष यांचे स्मरण करत नव्या पिढीने इतिहासातून प्रेरणा घ्यावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकाची उंची सुमारे १४० फूट असून, जागतिक कीर्तीचे शिल्पकार स्वर्गीय राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून या स्मारकाची ओळख निर्माण झाली आहे. मात्र, या स्मारकाची खरी ओळख केवळ त्याच्या भव्यतेपुरती मर्यादित न राहता ती स्वराज्याच्या विचारांचे प्रेरणास्थान व्हावी, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली.
या स्मारक परिसरात भव्य ऐतिहासिक ‘शंभूसृष्टी’ विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह स्वराज्यातील पराक्रमी सरदार आणि मावळ्यांचे पुतळे, ऐतिहासिक प्रसंगांची शिल्पे, म्युरल्स, ओपन एअर थिएटर तसेच आधुनिक दृकश्राव्य सुविधांचा समावेश प्रस्तावित आहे. त्यामुळे भविष्यात हा परिसर इतिहासप्रेमी, पर्यटक आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पुतळ्याची उंची जग पाहील; मात्र शिवशंभूंच्या विचारांची उंची भावी पिढ्यांच्या कर्तृत्वातून दिसली पाहिजे. या स्मारकाच्या माध्यमातून इतिहासाचे जतन आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. तसेच यापुढील काळात दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि बळीराजासाठी दुसरा दिवा प्रज्वलित करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे दीपोत्सवाला केवळ धार्मिक स्वरूप न राहता ऐतिहासिक स्मृती, सामाजिक बांधिलकी आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा व्यापक आशय प्राप्त झाला. ‘पहिला दिवा माझ्या राजासाठी’ या उपक्रमातून सुरू झालेला हा विचारांचा जागर आगामी काळात समाजप्रबोधनाचे माध्यम ठरणार आहे.
About The Author

