पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
सध्या कडाक्याची थंडी सुरू असून शहराचा पारा देखील १३ अंशाच्या खाली घसरला आहे. अशा थंडीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून शहरात कामासाठी आलेले परप्रांतीय कामगार राहण्यासाठी घर नसल्याने रात्री रस्त्याच्या कडेलाच राहतात. या लोकांना थंडीत मायेची उब मिळावी, यासाठी आकुर्डीतील मोनीबाबा आश्रमाच्या वतीने ऊबदार कपडे, चादरी, चटया तसेच ब्लॅंकेटचे वाटप केले. आश्रमातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.
गारठवणाऱ्या ऐन थंडीत कामगारांची अनेक कोवळी मुले पाय पोटात घेऊन कुडकुडत झोपलेली असतात. अशा थंडीमुळे कित्येक मुले सर्दी, ताप, श्वसनविकार, दमा, कोरडा खोकला अशा अनेक विषाणूजन्य आजारांनाही बळी पडतात. अशा आजारांपासून रस्त्यावरील लोकांना वाचविण्यासाठी आणि थंडीत त्यांच्या मुलांना मायेची ऊब देण्यासाठी दरवर्षी पिंपरी मार्केट, चिंचवडगाव, आकुर्डी, भोसरी, कासारवाडीसह विविध रेल्वे स्थानक, वल्लभनगर एसटी बसस्थानक परिसरात ऊबदार कपड्यांचे वाटप करते. अशोक खोसला यांच्या मार्गदर्शाखाली यंदाही हा उपक्रम झाला. यात गौतम भगत, कमलजीत सिंह, जसमित सिंह, भागवत सिंह, रोहीत तोडके, गगनदीप सिंह, गुर्जित सिंह, मन्ना सिंह, अमोल सिंह आदी सहभागी झाले होते.
रस्त्यावर झोपणाऱ्या गरजूंना आम्ही स्वेटर, पांघरूण उपलब्ध करून देत आहोत. गेल्या आठवड्यात रात्री ११ ते तीन यावेळेत शहरात वेगवेगळ्या भागांत फिरून गरम कपडे वाटप करण्यात आले.
– जगमोहन धिंग्रा, मोनीबाबा आश्रम