पिंपरी । प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये निश्चितपणे दर्जेदार उपचार मिळतात. तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांची गुणवत्ता खासगी रुग्णालयांपेक्षा चांगली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये कोणताही तज्ञ डॉक्टर रुग्णांना खासगी रुग्णालयांचा ‘रेफरन्स’ देणार नाही. ‘नो रेफरन्स’ बाबत धोरणात्मक निर्णय झाला असून, त्याची कडक अंमलबजावणी होणार आहे. कोणी डॉक्टर ‘रेफर’ करताना आढळ्यास त्याच्यावर कारवाई होईल. रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार मिळाले पाहिजेत, असा राज्य सरकारचा निर्धार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ‘अटल महाआरोग्य विनामूल्य शिबीर’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, माजी नगरसेवक उषा मुंढे, संतोष कांबळे, शशिकांत कदम, बाबासाहेब त्रिभूवन, शारदा सोनवणे, सविता खुळे, करुणा चिंचवडे, सुरेश भोईर, संदीप कस्पटे, अभिषेक बारणे, सागर आंघोळकर, आरती चोंधे, अंबरनाथ कांबळे, योगिता नागरगोजे, मनिषा पवार, विनायक गायकवाड, हर्षल ढोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडिगेरी, संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी स्वीकृत नगरसेवक विठ्ठल भोईर, महेश जगताप, संदीप गाडे, संदीप नखाते, कुणाल लांडगे, विनोद तापकीर, संजय कणसे, शर्मिला पवार, गोपाळ माळेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भारती विनोदे, काळूराम नढे आदी उपस्थित होते.
तसेच, महापालिका आयुक्त शेखर सिंह, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ येपल्ले, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, डॉ. वंदना जोशी, डॉ. विजय वाघ, डॉ. दिपक धोत्रे, डॉ. धर्मेंद्र कुमार, उद्योजक उमेश चांदगुडे, डीपीडीसी सदस्य अप्पा रेणुसे, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, भा.वी.साचे बिपिन पाटसकर, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, डॉ. शिवाजी ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणेश सहकारी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, प्रातिनिधीक स्वरुपात बळीराम महापूरे, दिलीप सोनकांबळे, वाजिद मंडल या दिव्यांग व्यक्तींना साहित्याची मदत करण्यात आली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, महाराष्ट्रात कॅन्सरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्याचे कारण अशुद्ध पाणी पुरवठा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठा आणि नदी संवर्धनासाठी पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक कुटुंबाना धीर देण्याचे काम झाले आहे. ही खऱ्या अर्थाने स्व. लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली ठरली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींसाठी वर्षभर उपचार सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजाणी केली आहे. जिजाऊ क्लिनिक सुरू केली आहेत. शहरात १ हजार ५०० हून अधिक वैद्यकीय कर्मचारी नागरी आरोग्यासाठी काम करीत आहोत. नामवंत शासकीय व खासगी हॉस्पिटल्स या शिबिरात सहभागी झाले आहेत. महापालिका प्रशासनाच्या भोसरी, आकुर्डी आणि जिजामाता हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभाग करावा, ज्यामुळे जास्तीत-जास्त रुग्णांना लाभ होईल. महापालिका प्रशासन एकूण अर्थसंकल्पातील १० टक्केहून अधिक निधी आम्ही आरोग्यासाठी खर्च करीत आहोत. थेरगाव येथे पीपीपी तत्त्वार कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.
आरोग्य शिबिर लक्ष्मणभाऊंना समर्पित : आमदार अश्विनी जगताप
अपाय होण्याआधीच उपाय व्हावा… या संकल्पनेतून लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांनी अटल महाआरोग्य विनामूल्य शिबिराची सुरूवात ९ वर्षांपूर्वी सुरू केली. कोविड काळात हजारो लोकांना आम्ही मदत केली आहे. आरोग्य शिबीर हे लोकनेते जगताप यांना आम्ही समर्पित करीत आहोत, असे आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या.
महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला मोफत उपचार : शहराध्यक्ष शंकर जगताप
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, गेल्या ९ वर्षांपासून प्रत्येक वर्षी किमान दीड ते दोन लाख रुग्णांची तपासणी केली जाते. त्याचा फॉलोअप वर्षभर केला जातो. गतवर्षी १५६ लोकांची एंजिओग्राफी केली होती. त्यामध्ये ७६ जणांची एंजिओप्लास्टी मोफत करण्यात आली. दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट, चष्मे, कान-नाक-घसा तपासणी यासह बहुतेक आजारांसाठी मोफत तपासणी व उपचार दिले जातात. गतवर्षी १७ कॅन्सर रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिली. १५० हून अधिक रुग्णालये आणि सुमारे २ हजार डॉक्टर यंदा शिबिरासाठी काम करणार आहेत. यावर्षी मोफत एक्स-रे, सोनोग्राफी, रक्ताच्या सुमारे १६० चाचण्या मोफत होणार आहेत. सुमारे ५ हजार लोकांचा डायलेसिस करण्याचा नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही रुग्णाला मोफत उपचार मिळणार आहे.
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांनी शेतकऱ्यांचे नैसर्गिक शेती करण्याबाबत जागृती करावी. रासायनिक खतांच्या वापरामुळे कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहात ग्रामपंचातीचा सरपंचापासून प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाणी प्रदूषण, जमीन प्रदूषणासाठी रोखण्यासाठी प्रशासन, सरकार आणि लोकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
– डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य.