
पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांचे लसीकरण करण्याचे पालकांना आवाहन
पुणे : प्रतिनिधी
‘पोलिओमुक्त भारत’ या उद्दिष्टाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल म्हणून पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय औंध आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.
पोलिओमुक्तीच्या उद्दिष्टाने जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांत ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ५ लाख ६ हजार ८०९, शहरी भागातील ६९ हजार ६९०, अशी एकूण ५७ लाख ६ हजार ४९७ बालकांना या मोहिमेअंतर्गत लसीचे दोन थेंब पाजले जाणार आहेत.
यासाठी ४ हजार २२३ लसीकरण केंद्रे (बूथ) उभारण्यात आली असून, १० हजार ३१८ कर्मचारी, यामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच विविध स्थानिक स्वयंसेवी संस्था सहभाग घेणार आहेत.
लसीकरणाच्या दिवशी काही बालके वंचित राहू नयेत म्हणून १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. या काळात आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरपोच भेट देऊन ‘दोन थेंब जीवनाचे’ प्रत्येक बालकाला मिळतील, याची खात्री करतील.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. लसींचा पुरेसा साठा आणि वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली असून, मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील म्हणाले, “आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे ही आदर्श आणि जबाबदार पालक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. आरोग्य विभागाने या मोहिमेसाठी सर्वतोपरी तयारी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची पालकांनी खात्री करावी.”
जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, समाजसेवी संस्था तसेच पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. हंकारे यांनी केले आहे.
About The Author
