
दुपारी ११ ते सायं. ५ पर्यंत प्रवासी थांबले, पण आवाज बुलंद!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
शहराच्या रस्त्यांवर गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) नेहमीचा गोंगाट नव्हता… कारण शहराची चाकेच थांबली होती! रिक्षा-टॅक्सी चालकांच्या न्याय्य हक्कांसाठी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी ‘बंद’ पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर टक्के (१००%) यशस्वी ठरला. दुपारी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रिक्षा-टॅक्सी सेवा ठप्प राहिली. प्रवाशांची गैरसोय झाली असली, तरी चालकांच्या ‘अस्तित्वाच्या लढ्याने’ शासनाचे लक्ष वेधून घेतले.
‘ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र विभाग)’, ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत’, ‘रिक्षा ब्रिगेड’ आणि ‘ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला होता.
कष्टकऱ्यांचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो रिक्षा चालक-मालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (पिंपरी) येथे आंदोलनकर्ते जमा झाले आणि “बाईक टॅक्सी बंद करा!” “मुक्त परवाना रद्द करा!” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनानंतर रिक्षा चालक-मालकांच्या वतीने आरटीओ अधिकारी आदित्य जाधव व विजय चौधरी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी हे निवेदन मंत्रालयात तातडीने पाठवण्याचे आश्वासन दिले. तसेच, संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनाही निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात बोलताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले, शहरात रिक्षांची संख्या वाढली असून प्रवाशांची संख्या घटली आहे. टू-व्हीलर टॅक्सीला आमचा ठाम विरोध आहे.
सरकारने चर्चा सुरू केली असली, तरी आमच्या मुख्य मागण्यांवर निर्णय झालेला नाही. त्यामुळे आम्ही अर्धदिवसीय बंद ठेवला असून, या बंदला चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.”
ठोस पाच मागण्या –
1) ‘मुक्त परवाना’ धोरणावर कायमस्वरूपी बंदी.
2) बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा तत्काळ बंद.
3) रिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना.
4) ओला-उबर दरांचे नियमन – किमान ₹१७ प्रति किमी दर निश्चित करावा.
5) CNG बॉटल टेस्टिंग शुल्क पुन्हा ₹५०० करावे.
संयुक्त कृती समितीचे युवा अध्यक्ष शुभम तांदळे म्हणाले : “जोपर्यंत या मागण्यांवर शासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत रिक्षा चालक-मालक शांत बसणार नाहीत.
परिवहन क्षेत्रातील बदल हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. शासनाने तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलवावी.”
या वेळी अनिल शिरसाठ, जाफरभाई शेख, विशाल ससाणे, सिद्धार्थ साबळे, सलीम पठाण, उमाकांत शिंदे, पप्पू वाल्मिकी, अक्षय गायकवाड, दत्ता गिले, मयूर अडागळे, बापू कांबळे, विजय जावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
