
काळाखडक येथील लॉजमध्ये तरुणीचा खून
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
वाकड परिसरातील काळाखडक येथील एका लॉजमध्ये तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादामुळे हा खून झाल्याचे समोर आले असून, आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलावर सिंग (वय २५, रा. पिसोळी, पुणे) हा आपल्या मैत्रीण मेरी मल्लेश तेलगु (वय २६, रा. देहूरोड) हिच्यासोबत दुपारी काळाखडक येथील एका लॉजमध्ये आला होता. दरम्यान, दिलावरने मेरीचा मोबाईल तपासला असता तिला दुसऱ्या व्यक्तीसोबतचे अश्लील फोटो दिसले. यामुळे तो संतापला आणि रागाच्या भरात त्याने सोबत आणलेल्या चाकू व लोखंडी पानाने तिच्यावर वार करून जागीच खून केला.
या घटनेनंतर आरोपी दिलावर सिंग स्वतः कोंढवा पोलिस ठाण्यात हजर झाला व खुनाची कबुली दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तत्काळ वाकड पोलिसांना माहिती दिली. वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मुलीचा मृतदेह मिळाला. त्यानंतर गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे वाकड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातील अविश्वासातून घडलेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
About The Author
