
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सरदार@युनिटी मार्च’ हे अभियान 6 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर या काळात तीन टप्प्यात राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राबवण्यात येणार आहे. 6 ऑक्टोबर पासून देशभर सुरू झालेल्या या पदयात्रेच्या दुस-या टप्प्यात 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 3 दिवसीय पदयात्रेमध्ये विविध समाज घटक, संस्था, एनजीओ सहभागी होणार असून भाजपा युवा मोर्चातर्फे या अभियानात युवकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस व प्रदेश युवा मोर्चा प्रभारी आ.विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एकसंध राष्ट्र बनवणा-या सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त लाखो युवकांना घेऊन सरदार पटेल यांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असे आ.पाटील यांनी नमूद केले.
यावेळी आ. पाटील म्हणाले की, या अभियानाच्या निमित्ताने राज्यभर दोन महिने जनजागरणाचा महायज्ञ होणार आहे. सरदार पटेलांच्या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांच्या भारताच्या अखंडतेचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम युवा वर्ग पदयात्रेच्या माध्यमातून जोमाने करेल. 2047 साली विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युवक योगदान देतील असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला. आ. पाटील यांनी सांगितले की, भारताची अखंडता, एकात्मता, राष्ट्रभक्ति आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या युवा पिढीमध्ये जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. ‘सरदार@युनिटी मार्च’ या पदयात्रेसोबतच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात स्थानिक विकास कार्यक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, महिला कल्याण शिबिरे, आरोग्य व योग कार्यक्रम, वक्तृत्व,निबंध, वादविवाद अशा विविध स्पर्धा ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष घेण्यात येणार आहेत. पथनाट्य, नशामुक्ती व आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी ची शपथ घेणे असे विविध कार्यक्रम अभियानात होणार आहेत. कोणताही राजकीय उद्देश न ठेवता या पदयात्रेत जास्तीतजास्त अराजकीय युवा जोडण्यावर भर दिला जाणार आहे.तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली. 6 ऑक्टोबरपासून या अभियानाला ऑनलाइन सुरुवात झाली असून दुस-या टप्प्यात राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 3 दिवसीय पदयात्रेच्या माध्यमातून युवा वर्गाला जोडण्यावर भर दिला जाईल. तर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनापासून 6 डिसेंबर पर्यंत तिस-या राष्ट्रीय स्तरावरच्या टप्प्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातून 5-6 युवक गुजरातला पोहोचून सरदार पटेल यांचे जन्मस्थळ करमसद ते स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया या दरम्यान 152 किमी ची पदयात्रा काढतील अशीही माहिती आ.पाटील यांनी
दिली.
About The Author
