पिंपरी : सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा ८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. यंदाच्या पाचव्या हंगामात १६ पुरुष संघ व ६ महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा होणार, त्याचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहायला मिळणार आहे. देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता व्हावी, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्राधान्य द्यावे आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वानी, अवि तेजवानी, अवि इसरानी, कुणाल गुडेला, पियुष जेठानी यांच्यासह संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.
हितेश दादलानी म्हणाले, ‘सिंधी प्रीमियर लीग सीजन ५’चे उद्घाटन ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. ही स्पर्धा देशातील सर्व सिंधी समाजपर्यंत पोहचवायची आहे. ‘सिंधी फक्त व्यवसायापुरतेच आहेत’ हा समज खोडून काढावा यासाठीही आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येतो” “पिंपरी चिंचवडमधील विविध क्षेत्रातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे.
कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या चार हंगामात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जवळपास १५ लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. यंदा स्पर्धेला व्यापक स्वरूप येत असून, पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड, बंगळुरू येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. यंदा महिलांनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असून, महिलांचे सहा संघ स्पर्धा खेळणार आहेत. पुरुषांचे १६ संघमालक व महिलांचे ६ संघमालक आपल्या २२ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे.”